दोन गांजा विक्रेत्यांना १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:40+5:302020-12-09T04:07:40+5:30
नागपूर : सत्र न्यायालयाने दोन गांजा विक्रेत्यांना १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड ...
नागपूर : सत्र न्यायालयाने दोन गांजा विक्रेत्यांना १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्या. एस. जे. भारुका यांनी हा निर्णय दिला.
व्यंकटकुमार रमण ऊर्फ राजा नारायण सिंह (२७) व सुशीलकुमार बद्रीप्रसाद चंदा (२८) अशी आरोपींची नावे असून, ते नागपूर येथील रहिवासी आहेत. ९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९ च्या सुमारास हे आरोपी हिंगणा परिसरातील जसमित धाब्यापुढील पुलाजवळ कारसह थांबले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्याच्या टीपवरून त्या ठिकाणी पोहचून कारची झडती घेतली असता ८ लाख ९३ हजार ३८० रुपये किमतीचा ८९.३३८ किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पथकाने गांजासह दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख असा एकूण १५ लाख ५१ हजार ३८० रुपयाचा माल जप्त केला, तसेच आरोपींविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून आरोपींना अटक करण्यात आली. सत्र न्यायालयात सरकारने विविध महत्त्वपूर्ण पुरावे सादर करून आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.