नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:44 PM2020-09-02T19:44:50+5:302020-09-02T19:47:48+5:30
जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उतारा शिवारातील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा (नागपूर) : जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उतारा शिवारातील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली. सुजत ऊर्फ मोनु जगदीश घाटवाडे (१२) व भोजराज लक्ष्मण चचाने (१५) दोघेही रा. अंबाडा(सा.) अशी मृत मुलांची नावे आहेत.
मंगळवारी हे दोघे घरच्यांना न सांगता उतारा शिवारातील जंगलात असलेल्या शेततळ्यात पोहायला गेले होते. या दोन्ही मुलांचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. आई- वडील बाहेरून परत आल्यावर दोन्ही मुलांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना शेत तळ्याच्या बाजूला या मुलांचे कपडे दिसले. त्यांनी ही माहिती मुलांच्या घरच्यांना सांगितली. यानंतर शेततळ्याची पाहणी केली असता एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला तर दुसरा आत बुडालेला होता. या घटनेची माहिती जलालखेडा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील शवविच्छेदन गृहात पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून. बुधवारी त्या दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या लहान मुलांच्या मृत्यूमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. सुजतला एक भाऊ आहे तर भोजराज हा आई-वडीलांना एकटा मुलगा होता. या घटनेचा तपास ठाणेदार दीपक डेकाटे, उपनिरीक्ष राजेंद्र सोनवाने, बिट जमादार मोरेश्वर चलपे, पोलीस कर्मचारी दिनेश हिवसे करीत आहे.