नागपुरात एका बेडवर दोन कोरोना रुग्ण; प्रशासन हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 09:08 AM2021-03-26T09:08:00+5:302021-03-26T09:09:23+5:30
Nagpur news Coronavirus Cases उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.
गेल्या वर्षी आॅक्टोबरनंतर काही महिने संक्रमण कमी झाले होते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील दहा दिवसांपासून शहरात दर दिवसाला २५०० ते ३००० हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. २५ मार्चपर्यंत शहरात १ लाख ६७ हजार ५०० रुग्ण पॉझिटिव्ह झाले. होम आयासोलेशनमधील रुग्णांची संख्या २४ हजारांवर गेली आहे. महापालिका प्रशासन उपाययोजना करीत आहे; परंतु वाढत्या रुग्णांच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. गंभीर रुग्णांना भरती होण्यासाठी भटकंती करावी लागते. रुग्णालयात वेळीच बेड मिळत नाही. वेटिंगवर राहावे लागते. या संदर्भात प्रशासनाला धारेवर धरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुरुवारी नगरसेवकांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत केली.
शहरातील कोरोना संक्रमणाचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध बेड, लसीकरण व आरटीपीसीआर चाचण्यांसंदर्भात वस्तुस्थिती मांडण्याची मागणी केली. प्रफुल्ल गुडधे म्हणाले, बाधित रुग्णांना भरती व्हायचे असेल तर यंत्रणा सक्षम नाही. वेळीच बेड उपलब्ध होत नाही. मागणीनुसार आॅक्सिजनचा पुरवठा केला जात नाही. मनपा रुग्णालयात औषध मिळत नाही. यावर प्रशासनाने तात्काळ उपायोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
मेयो, मेडिकलमध्ये गंभीर रुग्णांना वेळीच बेड मिळत नाही. वेटिंगवर राहावे लागत असल्याचे आभा पांडे यांनी निदर्शनास आणले. नंदा जिचकार यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी जनजागृती करण्याची सूचना केली. दिव्या धुरडे यांनी मेयो, मेडिकलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणले. नितीन साठवणे यांनी खासगी रुग्णालयांकडून वारेमाप बिल काढले जात असून यावर मनपाचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला. सुनील हिरणवार, जितेंद्र घोडेस्वार यांनीही कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.