दोन कोटींनी फसवणूक
By admin | Published: September 14, 2015 03:07 AM2015-09-14T03:07:47+5:302015-09-14T03:07:47+5:30
बहुचर्चित कंपनीत ५१ टक्क्यांची भागीदारी देण्याची बतावणी करून पुण्यातील एका दाम्पत्याला नागपूरकर कंपनी संचालकाने २ कोटींचा गंडा घातला.
नागपूर : बहुचर्चित कंपनीत ५१ टक्क्यांची भागीदारी देण्याची बतावणी करून पुण्यातील एका दाम्पत्याला नागपूरकर कंपनी संचालकाने २ कोटींचा गंडा घातला. गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवहारात फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे पीडित व्यक्तीने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
चेतन जयंतीलाल शहा (वय ४५) असे तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव असून, ते पुण्यातील एमएस मार्गावर राहतात. त्यांची पत्नी शेपाली या ब्युटीशियन आहेत. तर, चेतन विदेशात नोकरीला असल्याचे पोलीस सांगतात. शहा दाम्पत्यांची २०११ मध्ये बहुचर्चित लेगाटो हेअर अॅन्ड स्कीन इंटरनॅशनल प्रा. लि. नागपूरचे संचालक अनिल वामनराव आदमने यांच्याशी भेट झाली. आदमने आशीर्वाद एनआयटी कॉलनी, विश्वकर्मानगरात राहातात. शहा दाम्पत्यांचा आदमनेशी पुढे संपर्क वाढला. परस्परांवरील विश्वास वाढल्यानंतर आदमनेंनी सदरमधील पूनम चेंबर्समध्ये लेगाटोचे मुख्यालय असून, या कंपनीच्या मोठमोठ्या हॉटेल, मॉलमध्ये ठिकठिकाणी शाखा आहेत. लेगाटोत शेपाली यांच्या नावाने ५१ टक्क्यांची भागीदारी देऊन व्यवसाय करण्याचा प्रस्ताव आदमनेंनी दिला. त्याबदल्यात त्याने शहा दाम्पत्याकडून २ कोटी ५ लाख रुपये घेतले. २९ जून २०११ ते सप्टेंबर २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षात आदमनेने लेगाटोत ठरल्याप्रमाणे शेपाली यांना ५१ टक्यांची भागीदारी दिली नाही. यामुळे आदमने आणि शहा दाम्पत्यात वाद झाला. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे शनिवारी शहा यांनी सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर लेगाटो हेअर अॅण्ड स्किन इन्टरनॅशनल प्रा. ली. नागपूर तसेच अनिल वामनराव आदमनेविरुध्द कलम ४०९, ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपीला अटक झाली की नाही, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)