नागपुरात एकाच दिवशी दोन सायबर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 03:21 PM2018-09-06T15:21:57+5:302018-09-06T15:22:20+5:30
तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत नागपुरातील तिघांच्या खात्यातून एका आरोपीने दोन लाखांची रोकड काढून घेतली. सायबर गुन्हेगाराने अवघ्या चार मिनिटात ही हातचलाखी केली. या प्रकरणात बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
सीताबर्डीत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत नागपुरातील तिघांच्या खात्यातून एका आरोपीने दोन लाखांची रोकड काढून घेतली. सायबर गुन्हेगाराने अवघ्या चार मिनिटात ही हातचलाखी केली. या प्रकरणात बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
मोमिनपु-यातील कमाल बाबा दर्गाहच्या मागे राहणारे अब्दुल रशिद अब्दुल हफिज कुरेशी (वय ६५) यांच्या तसेच सुनंदा नांदुरकर यांच्या खात्यातून ४ मे च्या रात्री ११. ५४ च्या सुमारास सायबर गुन्हेगाराने १ लाख, २३ हजार, ४०० रुपये काढून घेतले. भोले पेट्रोल पंपाजवळच्या एटीएममधून आरोपीने ही रक्कम लंपास केली.
या गैरप्रकाराच्या चार मिनिटांनंतर, ११ वाजून ५८ मिनिटांनी वाठोड्यातील स्वामी नारायण मंदीराजवळ राहणारे सोहनलाल सुग्रीव गौतम (वय २०) यांच्या खात्यातून अशाच प्रकारे ७८ हजार, ५०० रुपये काढून घेतले. ही रक्कम देखिल भोले पेट्रोल पंपाजवळच्या एटीएममधूनच काढण्यात आली. हे दोन्ही गैरप्रकार तब्बल ४ महिन्यानंतर उघडकीस आले.
दोन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच
विशेष म्हणजे, तीनही पीडित व्यक्ती यावेळी स्वत:च्या घरी होते आणि त्यांचे कार्डही त्यांच्याचजवळ होते. तरीसुद्धा आरोपीने ही रक्कम लंपास केली. अवघ्या चार मिनिटात एकाच एटीएममध्ये हा गैरप्रकार घडला. त्यामुळे एकाच आरोपीचे हे कृत्य असावे, असा अंदाज आहे. बुधवारी या प्रकरणी रशिद आणि गौतम या दोघाच्या वेगवेगळ्या तक्रारी नोंदवून घेत सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.