क्रूर काळजाच्या बापाने दोन दिवसांच्या बाळाला हिसकावून फरशीवर आपटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:55 AM2023-01-02T11:55:30+5:302023-01-02T12:03:42+5:30
मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४६ मधील घटना, आरोपी बापाला अटक
नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या दोन दिवसांच्या बाळाला हिसकावून फरशीवर आपटल्याची घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये शनिवारी सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान घडली. दरम्यान बाळाला आपटणाऱ्या क्रुर काळजाच्या बापाला अजनी पोलिसांनी गजाआड केले असून, डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या बाळावर मेडिकलच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.
गिरीष महादेवराव गोंडाणे (३२, सावरडी, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या निर्दयी बापाचे नाव आहे. जीवनकला नरेश मेश्राम (५०, सावरडी, जि. अमरावती) यांची मुलगी प्रतीक्षा हिचा प्रेमविवाह जुलै २०२१ मध्ये आरोपी गिरीष सोबत झाला. गिरीष हातमजुरीचे काम करतो. लग्नानंतर सगळे काही सुरळीत सुरू असताना गिरीष प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते.
दरम्यान, प्रतीक्षा गरोदर असल्यामुळे ती अमरावतीच्या रुग्णालयात बाळंतपणासाठी गेली. तेथील डॉक्टरांनी तिला मेडिकलमध्ये रेफर केले. मेडिकलमध्ये २८ डिसेंबरला ती वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये भरती झाली. दोन दिवसांनी ३० डिसेंबरला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर ३१ डिसेंबरला सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान आरोपी गिरीष मेडिकलमध्ये पोहोचला. त्याने प्रतीक्षा भरती असलेल्या वॉर्डात जाऊन प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने प्रतीक्षा जवळून दोन दिवसांचे बाळ हिसकावले आणि फरशीवर आपटून बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
प्रतीक्षाने आरडाओरड केल्यानंतर आरोपी गिरीष तेथून फरार झाला. वॉर्डातील परिचारिकांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर वॉर्ड क्रमांक ५० मध्ये अतिदक्षता कक्षात उपचार करण्यात येत आहेत. प्रतीक्षाची आई जीवनकला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनीचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत संघर्षी यांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.