मतदानाला दोन दिवस बाकी अन नागपूर जिल्ह्यात दोन कारमधून ९ लाख रुपयांची जप्ती
By योगेश पांडे | Published: April 17, 2024 11:06 PM2024-04-17T23:06:35+5:302024-04-17T23:06:47+5:30
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे पथक मांढळ-कुही मार्गावरील वग टी-पाॅइंटजवळ वाहनांची तपासणी करीत हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : निवडणूक विभागाने जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन कारमधून ९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल मार्ग व कुही पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मांढळ-कुही राेडवरील वग (ता. कुही) टी-पाॅइंटजवळ या दोन्ही कारवाया करण्यात आला.
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे पथक मांढळ-कुही मार्गावरील वग टी-पाॅइंटजवळ वाहनांची तपासणी करीत हाेते. या पथकाने कार (क्रमांक एमएच-४०, बीजे-१२६२) थांबविली व झडती घेतली. त्यांना कारमधील बॅगमध्ये ६ लाख ६० हजार ७४१ रुपयांची राेख आढळून आली. ही रक्कम कैलास टिकमदास गोविंदानी (रा. उमरेड) यांच्या मालकीची असल्याचे कारचालक महेंद्र रोहिदास राठोड आणि त्याचा सहकारी मनोज बळीराम चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कैलास गाेविंदानी यांना सूचना देऊनही त्यांनी या रकमेबाबत काेणतीही कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि ती रक्कम जप्त करून कुही पाेलिसांच्या ताब्यात दिली. शिवाय, कैलास गाेविंदानी यांना जिल्हा गाऱ्हाणी समितीकडे दाद मागण्याची सूचना केली. ही कारवाई निवडणूक विभागाचे संदीप वडापळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. मतदान दाेन दिवसांवर असल्याने या रकमेबाबत संशय बळावला आहे.
काटोल मार्गावरदेखील जप्ती
नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन काटोल नाक्यावर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास निवडणूक आयोगाच्या पथकाने एका कारला थांबविले. त्यात झडती घेतली असता २.२१ लाख रुपयांची रोकड आढळून आली. कारमधील वाडीतील व्यक्तीला या रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यात निवडणूकीशी संबंधित पत्रकेदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद कालेकर यांना विचारणा केली असता त्यांनी रक्कम जप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र कारवाई निवडणूक विभागाच्या पथकाने केल्याने अधिक तपशील नसल्याचे स्पष्ट केले.