दोन दिवसात एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्द
By admin | Published: December 23, 2015 03:41 AM2015-12-23T03:41:17+5:302015-12-23T03:41:17+5:30
केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देणे आवश्यक आहे.
एफआरपीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
नागपूर : केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी १३० कारखान्यांनी एफआरपी दिली. ज्यांनी अद्याप एफआरपी दिली नाही, अशा कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी दोन दिवसात एफआरपी दिली नाही तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
एफआरपी देण्याबाबत ८०: २० चा फार्म्युला निश्चित करण्यात आला असला तरी साखरेचे भाव पडल्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत, याकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. पवार म्हणाले, भाव पडत असल्यामुळे व्यापारी अडचणीतील साखर कारखान्यांना पैसे देऊन साखरेचा साठा करीत आहेत. भविष्यात तूर दाळीसारखा साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफआरपीबाबत सरकार फेरविचार करेल का, असा प्रश्न त्यांनी केला.
यावर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्याने ऊस देताच त्याला १५ दिवसात १०० टक्के एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, कोसळणाऱ्या दरांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनांशी चर्चा केली. संघटनांनी पहिल्या टप्प्यात ८० टक्के एफआरपी घेणे मान्य केले.
राज्य सहकारी बँकेनेही मूल्यांकन वाढविले. खरेदी कर माफ करण्यात आला. एवढे करूनही एफआरपी दिली जात नसेल तर कारवाईशिवाय पर्याय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात यांनी एफआरपीचा फार्म्युला बदलण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी एफआरपी केंद्र सरकार निश्चित करीत असल्याचे सांगत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्ली येथे पंतप्रधानांच्या भेटीसाठी नेले जाईल व त्यांच्याकडे तशी मागणी केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
२०१४-१५ च्या हंंगामातील एफआरपीनुसार देय ऊस देयक १९ हजार १२० कोटींपैकी १८ हजार ४१८ कोटींची म्हणजे ९७ टक्के देयके देण्यात आली आहेत. २०१५-१६ च्या हंगामात ९१ सहकारी व ७४ खासगी असे एकूण १६५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केलेला असून १५ डिसेंबर २०१५ अखेर २२६.५९ लाक मे.टन उसाचे गाळप होऊन सरासरी १०.१३ टक्के साखर उताऱ्याने २२९.६४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.(प्रतिनिधी)