नागपुरात आठवड्यात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 09:50 PM2020-08-31T21:50:19+5:302020-08-31T21:52:01+5:30
नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, दर आठवड्यात शनिवार आणि रविवार असा दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ घोषित करावा आणि व्यापारपेठांसंदर्भात सम-विषम नियम शिथिल करण्यात यावा, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर हा नियम शिथिल करण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, दर आठवड्यात शनिवार आणि रविवार असा दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ घोषित करावा आणि व्यापारपेठांसंदर्भात सम-विषम नियम शिथिल करण्यात यावा, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर हा नियम शिथिल करण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मनपा मुख्यालयातील सभागृहात कोविड-१९ संदर्भातील उपाययोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली.
जनता कर्फ्यू यासंदर्भात विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यावा, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना संकटांना सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य व्यवस्था सुदृढ करा, खासगी रुग्णालयांनीही रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिलाची आकारणी करावी. तक्रारी आल्यास रुग्णांच्या बिलांचे थर्ड पार्टी ऑडिट करावे, असे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.
बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष उपनेते नरेंद्र बोरकर, वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.
अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून मोठी रक्कम आकारली जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्तस्तराची समिती तयार करा, असे कृष्णा खोपडे यांनी सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी शहरातील अनेक समाजभवन उपलब्ध होऊ शकतात. ज्यांच्या घरात व्यवस्था नाही, अशांना या ठिकाणी ठेवता येईल, अशी सूचना मोहन मते यांनी केली. प्रवीण दटके यांनी चाचणी केंद्र वाढविण्याची मागणी केली. त्यांना दक्षिण आणि पूर्व मतदारसंघात आरटी-पीसीआर चाचणीची व्यवस्था नाही. सक्करदारा आयुर्वेदिक रुग्णालय आणि नगरभवन येथे ही व्यवस्था करण्यावर विचार करावा, अशी सूचना केली. विकास कुंभारे यांनी गांधीबाग झोनमध्ये शववाहिका उपलब्ध करावी, अशी सूचना मांडली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सूचनांवर मनपा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.
१६ नवीन चाचणी केंद्र
सध्या ३४ चाचणी केंद्र असून, लवकरच नव्याने १६ केंद्र सुरू करीत आहोत. प्रत्येक केंद्रांवर किमान १०० चाचण्या होतील, यादृष्टीने प्रयत्न राहील, असे आयुक्तांनी सांगितले. खासगी रुग्णालयासंदर्भात तक्रारी आल्या तर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बेडस्च्या उपलब्धतेसाठी केंद्रीय कॉल सेंटर
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने कुठे जावे, कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, याबाबत रुग्णांमध्येच संभ्रम असतो. मात्र, मनपाने ही व्यवस्था केंद्रीय पद्धतीने केली आहे. ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर नागरिकांनी फोन केल्यास त्यांना बेड्सची उपलब्धता, खासगी रुग्णालयातील दर आदी माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांनी या क्रमांकाचा उपयोग करावा, असे आवाहन केले आहे.