सशस्त्र टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला
By admin | Published: May 8, 2014 01:04 AM2014-05-08T01:04:08+5:302014-05-08T01:04:08+5:30
तीन ते चार वाहनातून आलेल्या १५ ते २० जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन तरुणांवर चाकू आणि लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला.
अप्सरा चौकातील घटना : चाकूचे वार, तीन वाहने फोडली
यवतमाळ : तीन ते चार वाहनातून आलेल्या १५ ते २० जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन तरुणांवर चाकू आणि लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये संबंधित दोघे गंभीर जखमी झाले. या वेळी त्यांना वाचविण्यास गेलेल्या लॉज चालकालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर परिसरात ठेवलेल्या तीन कार फोडून टोळके घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना येथील अप्सरा चौकात घडली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राजू जयस्वाल, विजय उर्फ टोनू ढोरे दोघेही रा. यवतमाळ अशी चाकू हल्ल्यातील जखमींची नावे आहे. तर त्यांना वाचविताना अंकुश वसंतराव बगमारे रा.अप्सरा चौक यालाही बेदम मारहाण झाली.
अंकुश बगमारे याचे अप्सरा चौकातच लॉज आहे. बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन ते चार अज्ञात तरूण लॉजमध्ये आले. या वेळी लॉजचा मॅनेजर सुभाष भरतीया याने त्यांना खोली देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी भरतीया याच्याशी वाद घातला. त्यानंतर हे तरुण तेथून निघून गेले. काही वेळातच ते १५ ते २० साथीदारांसमवेत तेथे दोन ते तीन वाहनातून आले. या वेळी त्यांनी विजय उर्फ टोनू ढोरे याला लोखंडी पाईपने मारहाण करीत त्याच्यावर चाकूहल्ला केला. टोनूची आरडाओरड ऐकून लॉजच्या बाजूलाच असलेल्या वाईन शॉपचा चालक राजू जयस्वाल धावत आला. तेव्हा टोळक्याने त्याच्या डोक्यावर चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात टोनूूच्या डोक्याला आणि पायाला तर राजूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हे पाहून अंकुश बगमारे मदतीला धावला. या वेळी टोळक्याने त्यालाही मारहाण केली.
तत्पूर्वी रस्त्याच्या कडेला ठेवून असलेल्या तीन कारच्या काचा या टोळक्याने फोडल्या. त्यामध्ये राजू जयस्वाल यांची व्हॅन (क्र. एमएच-२९-एडी-७३३), संतोष जयस्वाल यांची आयटेन (क्र. एमएच-२९-आर-२२७७) तर प्रशांत गोडे यांच्या आय २० (क्र. एमएच-२९-एडी-७६५) या वाहनांचा समावेश आहे. तोडफोडीनंतर टोळके आपल्या वाहनातून भरधाव पसार झाले. ते पसार होत असताना त्यांच्या आॅटोरिक्षाचा क्रमांक एका जागरुक नागरिकाने टिपून घेतला. या क्रमांकावर पोलिसांनी तपास केंद्रीत केला आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. (स्थानिक प्रतिनिधी)