नागपूरच्या सुपर स्पेशालिटी इस्पितळातील दोन डॉक्टरांनी पळविले ८३ हृदयरोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:54 PM2017-12-06T22:54:04+5:302017-12-06T22:55:03+5:30
शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाने घेतली असून मेडिकलशी संलग्न आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर विभागीय चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे.
गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय वरदान ठरत आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून अशा रुग्णांना निदान, उपचाराचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. मूत्रपिंड, हृदय, पोटाचे विकार आणि मेंदूचे विकार असलेल्या दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना या योजनेच्या माध्यमातून मदत उपलब्ध मिळत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन पैशाच्या लोभापायी येथे सेवा देणारे डॉक्टर येथील रुग्णाला खासगी रुग्णालयात पिटाळून लावतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची बाब भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निदर्शनास आणून दिली. या संदर्भात त्यांनी मंत्रालय स्तरावर तक्रारही केली. सुपरमधून पिटाळून लावलेल्या आणि शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या अशा ८३ रुग्णांची यादीच त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे. त्याची दखल घेत मंत्रालयाने खासगीत रुग्ण पळवून लावणाऱ्या सुपरमधील दोन डॉक्टरांच्या विभागीय चौकशीची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीदेखील विभागीय चौकशीच्या वृत्ताला दुजोरा दिला.