‘सावजी’त एकटे सोडल्याचा एकावर संताप; दोघांच्या भांडणात भलत्याचीच हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 05:41 PM2022-07-27T17:41:33+5:302022-07-27T18:05:23+5:30
पारडीतील अंबेनगरात थरार : दारूच्या नशेत अल्पवयीनासह दोन आरोपींकडून ‘गेम’
नागपूर : सावजी भोजनालयात एकटे सोडून घरी परत गेल्याच्या मुद्द्यावरून दारूच्या नशेत दोघांनी एकाचा खून केल्याची घटना पारडीतील अंबेनगरात घडली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या व्यक्तीला मारण्यासाठी आरोपी आले होते, त्याच्याऐवजी शेजारच्या व्यक्तीची हत्या केली. आरोपीदेखील त्याच वस्तीतील असून या प्रकारामुळे खळबळ माजली होती. नेमलाल गडे (५८) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी विनोद ऊर्फ गुड्डू तोरण निर्मलकर (३२) व त्याच्या अल्पवयीन भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबेनगर येथील रहिवासी मुकुंदा मते हे प्रॉपर्टी एजंट आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या विजय गुल्हाने याने त्यांना फोन करून सुभाननगर येथील लखन सावजी भोजनालय येथे बोलाविले. शेजारी राहणारे नेमलाल गडे (५८) यांना भाजी घ्यायची असल्याने त्यांना सोबत घेऊन मते बाजारात गेले. गडे यांना घरी पाठवून ते भोजनालयात गेले. तेथे युवराज वैद्य व आरोपी विनोद हेदेखील बसले होते. सर्वांनी मद्यप्राशन केले. विनोद आणखी वेळ बसण्याचा आग्रह करत होता. मात्र काम असल्याने गडे साडेसात वाजता घरी परत आले. काही वेळातच त्यांना विनोदचा फोन आला व ‘तू मला एकटा सोडून का आलास’ या मुद्द्यावरून त्याने वाद घालायला सुरुवात केली.
काही वेळातच विनोद त्याच्या लहान भावासह मते यांच्या घरी पोहोचला. मते अंगणातच होते व दोघांनीही मते यांना शिवीगाळ करत मारायला सुरुवात केली. नेमलाल गडे हे घरात स्वयंपाक करत होते व नेमक्या त्याचवेळी ते बाहेर आले. त्यांना पाहून दोघांनी त्यांनादेखील मारहाण केली. आरोपींनी गडे यांना ढकलले व त्यात गेटच्या सिमेंटच्या कॉलमशी त्यांची टक्कर झाली व ते खाली पडले. डोक्यातून रक्त निघत असतानादेखील आरोपींनी त्यांच्या छातीवर लाथा मारल्या. त्यानंतर आरोपी पळून गेले. गडे रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते व कुठलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे मते त्यांना जवळच्या खासगी इस्पितळात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मते यांच्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाण्यात आरोपी विनोद व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात हळहळ
नेमलाल गडे हे मुकुंदा मते यांच्या शेजारीच राहायचे व परिसरात ‘काकाजी’ म्हणून ते ओळखल्या जायचे. या वादात त्यांचा कुठलाही संबंध नव्हता. मात्र तरीदेखील त्यांना जीव गमवावा लागल्याने अंबेनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.