मेडिकलमध्ये पकडले दोन तडीपार गुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:30 PM2019-07-29T23:30:51+5:302019-07-29T23:32:27+5:30
तडीपार केलेल्या दोन गुंडांना मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या कार्याचे कौतुकही केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तडीपार केलेल्या दोन गुंडांना मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या कार्याचे कौतुकही केले.
मेडिकल रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ४२ च्या परिसरात दोन अज्ञात तरुण रविवार २८ जुलैच्या रात्री १२ वाजेदरम्यान बसून होते. याचवेळी महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) चे सुरक्षा पर्यवेक्षक जयराम बिनझाडे हे सहकारी निखिल तामनीक, इमरान शहा जुम्मा व शुभम ठोंबरे यांच्यासह गस्त घालत होते. सुरक्षारक्षकांना दोघांवरही संशय आला. पण, सुरक्षारक्षकांना पाहताच दोघेही पळाले. सुरक्षारक्षकांनी दोघांचाही पाठलाग करून पकडले. विचारपूस करता-करता सुरक्षारक्षकांनी दोघांनाही मेडिकल परिसरातील पोलीस चौकीत आणले. दोघांविषयी अधिक माहिती काढली असता त्यांनी अंकित उमाशंकर उसावरसे रा. खरबी व राजा अन्सारी उर्फ फिरोज अन्सारी रा. कामठी अशी नावे सांगितली. दोघांवरही घरफोडी, लुटमार, चोरी आदींसारखे ७० ते ७५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी दोघांनाही तडीपार केले आहे. मात्र, तरीसुद्धा ते नागपुरात आले आणि मेडिकल रुग्णालयात ते मध्यरात्री शिरले. काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांना ते दिसले आणि दोघांनाही पकडले.