‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट
By योगेश पांडे | Published: April 10, 2023 11:31 AM2023-04-10T11:31:47+5:302023-04-10T11:32:45+5:30
शहराध्यक्षांचे ‘नो ऑब्जेक्शन’, पदाधिकारी मात्र विरोधात
नागपूर : महाविकास आघाडीच्या १६ एप्रिलला आयोजित सभेला विरोध करण्यासाठी दर्शन कॉलनीत आंदोलन करण्यात आले. मात्र, या सभेवरून भाजपमधील गटबाजीही समोर आली आहे. एकीकडे भाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांनी ही सभा मैदानात होऊ देण्यास काहीच हरकत नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे, तर दुसरीकडे दर्शन कॉलनीतील आंदोलन आयोजित करण्यापासून तेथे निदर्शने देण्यात भाजपचे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक आघाडीवर होते. शहराध्यक्षांच्या भूमिकेशी हे पदाधिकारी सहमत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीने १६ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमूठ सभा’ आयोजित केली आहे. या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही येणार आहेत. ही सभा पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीतील मैदानात आयोजित करण्याची परवानगी मागण्यात आली होती व नासुप्रने लेखी परवानगी दिली. हे खेळाचे मैदान असून, राजकीय सभेमुळे ते खराब होईल, असा आक्षेप स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यानंतर, आ.कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी नासुप्र सभापतींना पत्र दिले व महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.
रविवारी आंदोलनही पुकारण्यात आले व पूर्व नागपुरातील भाजप कार्यकर्ते, तसेच पदाधिकाऱ्यांना तेथे उपस्थित राहण्याबाबत मॅसेजेसही गेले. प्रत्यक्ष आंदोलनाच्या दरम्यान भाजपचेच माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यातील अनेक जण तर दर्शन कॉलनीजवळचे रहिवासीही नाहीत व आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच आंदोलनात आल्याचे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. एकीकडे शहराध्यक्षांनी या सभेला ‘नो ऑब्जेक्शन’ असल्याचे स्पष्ट केल्यावर पदाधिकारी तेथे पोहोचून विरोध करत असल्याचे चित्रच ‘ऑल इज वेल’ नसल्याचे संकेत देत आहेत.
आयोजकांचा दावा, ‘नॉन पॉलिटिकल’ आंदोलन
आंदोलनाच्या आयोजकांनी हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हे, तर स्थानिकांचेच आंदोलन असल्याची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात कॉंग्रेस सोडून इतर सर्वच मोठ्या पक्षांचे कार्यकर्ते पोहोचले होते, असा दावाच आ.खोपडे यांनी केला आहे. एकीकडे शहराध्यक्षांची भूमिका व दुसरीकडे आंदोलनात दिसलेले चित्र, यामुळे ‘वज्रमूठ’बाबत भाजपची नेमकी दिशा काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.