कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Published: December 29, 2015 08:03 PM2015-12-29T20:03:48+5:302015-12-29T20:03:48+5:30

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Two farmers suicides due to indebtedness | कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Next

रिधोरा/नरखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटना काटोल तालुक्यातील रिधोरा येथे सोमवारी ७ वाजताच्या सुमारास तर दुसरी घटना नरखेड तालुक्यातील माणिकवाडा येथे रविवारी सकाळी उघडकीस आल्या.
गजानन संतोष सेलवटकर (५५, रा. रिधोरा, ता. काटोल) आणि चंपत जंगलू पांडे (६५, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. सेलवटकर यांच्याकडे सव्वादोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी इंडियन ओव्हरसिस बँक काटोल शाखेकडून ७५ हजार रुपये आणि रिधोरा येथील एका सोसायटीचे दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या तीन वर्षापासूनच्या नापिकीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यातच कर्जवसुलीसाठी बँक प्रशासन तगादा लावत असल्याने ते तणावात होते.
दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास रेशनचे धान्य आणण्याकरिता जातो म्हणून सायकल घेऊन घराबाहेर पडले. परंतु रात्र होऊनही वडील घरी आले नसल्याने मुलगा दिनेशने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गावालगतच्या कालव्याजवळ गजानन सेलवटकर यांनी आत्महत्या केल्याचे बातमी मिळाली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
कर्जवसुलीकरिता बँकेचा तगादा व सततची नापिकीमुळे सेलवटकर हताश झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने ते मानसिक तणावात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. गजानन सेलवटकर हे गावात लोहारकाम करीत होते. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीला धावूनही जात असत. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे.
आत्महत्येची दुसरी घटना माणिकवाडा येथे घडली. चंपत पांडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नातेवाईकांकडून दोन लाख ५० हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. तसेच शेतीवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० हजार रुपये कर्ज थकीत असल्याने इतर बँकांकडून कर्ज मिळाले नाही. त्यातच यंदा संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते सतत तणावात होते.दरम्यान, शनिवारी (दि.२६) रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपून चंपत पांडे घराबाहेर पडले. त्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. शासनाने दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Two farmers suicides due to indebtedness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.