दाेन मादी बिबट्यांची गाेरेवाडा उद्यानात प्रसूती; ४ बछडे सुरक्षित, एकाचा गर्भातच मृत्यू
By निशांत वानखेडे | Published: April 19, 2023 04:30 PM2023-04-19T16:30:32+5:302023-04-19T16:36:06+5:30
'चिंकी'वर तातडीचे उपचार सुरू
नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यानात दाेन दिवसात ‘चिंकी’ आणि ‘रूची’ या दाेन मादी बिबट्यांची प्रसूती झाली. यात रूचीने तीन बछड्यांना जन्म दिला असून ते तिन्ही सुरक्षित आहेत. दुसरीकडे चिंकीने एका शावकाला सुरक्षित जन्म दिला पण दुसऱ्याचा गर्भातच मृत्यु झाला. सध्या चिंकीवर उपचार सुरू आहेत.
गाेरेवाडा उद्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे चिंकीने दाेन बछड्यांना जन्म दिला. पहिली प्रसूती सरक्षित झाली व पिल्लाचा जन्म एकदम सुरक्षित झाला पण दुसरे गर्भातच दगावले. यादरम्यान रक्तस्राव होऊन चिंकीला संसर्ग झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पहिल्या पिल्लाला कृत्रिमरित्या संभाळले जात आहे. तिच्यानंतर साेमवारी रुची बिबटची प्रसूती झाली व तिने तिन्ही बछड्यांना सुरक्षित जन्म दिला. तिने तिन्ही पिल्लांना स्वीकारले असून ती त्यांचा व्यवस्थित संभाळ करत आहे.
या बिबट्यांची प्रसूती व्यवस्थित होणेसाठी गोरेवाडा प्रशासनाकडून विशेष काळाजी घेण्यात आली होती. दोन्ही माद्यांना स्वतंत्र बाळंतगुफा तयार करुन त्यांच्यावर सीसीटिव्हीच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांच्या दैनंदीन आहारासोबत विशेष आयुर्वेदीक पोषक तत्वे माद्यांना नियमित देण्यात येत होते. प्रसूतीदरम्यान प्राणिसंग्रहालय संचालक एस. एस. भागवत, पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे, अभिरक्षक दिपक सावंत आणि सहा. वनसंरक्षक सारिका खोत उपस्थित होते. चिंकीच्या उपचाराकरिता वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे पशुवैद्यक डॉ. सुजित कोलंगथ यांच्या मदतीने उपचार सुरु आहेत. चिंकीच्या प्रसूतीसाठी सहकारी संतोष पायघन आणि राम नान्हे तर रुचीसाठी निलेश चिंतनवार आणि शैलेश गवळी यांनी सहकार्य केले.