नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली!
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 20, 2024 10:41 PM2024-07-20T22:41:56+5:302024-07-20T22:42:43+5:30
हैदराबाद-नागपूर विमान परत नागपुरात आलेच नाही
नागपूर : शनिवारी सकाळी हैदराबाद आणि लखनौहून नागपुरात येणारी दोन उड्डाणे खराब हवामानामुळे भोपाळकडे वळविण्यात आली. यापैकी हैदराबाद-नागपूरविमान भोपाळमध्ये उतरल्यानंतर नागपुरात परत येऊ शकले नाही.
नागपुरात शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळावर कमी दृश्यमानतेची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ए ७४५२ हैदराबाद-नागपूर सकाळी ८.१५ वाजता भोपाळकडे वळविण्यात आले.
काही वेळानंतर इंडिगो फ्लाइट क्रमांक ६ए ७४६२ लखनौ-नागपूर हेसुद्धा सकाळी ९.१५ वाजता भोपाळला नेण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पावसामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानांना उतरू दिले नाही. वास्तविक पाहता कमी दृश्यमानतेची समस्या कायम राहिली.
दोन विमानांपैकी हैदराबाद-नागपूर विमान वळविले आणि भोपाळ विमानतळावर उतरले तेव्हा त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हैदराबादहून नागपूरकडे येणारे प्रवासी भोपाळमध्येच अडकून पडले. दुसरीकडे, लखनौ-नागपूर विमान सुमारे ५ तास भोपाळमध्ये अडकल्यानंतर नागपुरात पोहोचले.
विशेष म्हणजे शुक्रवारीही मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागपूरच्या विमानसेवांवर परिणाम झाला होता. या दिवशी इंडिगो एअरलाइन्सची चार उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याशिवाय मुंबईहून एअर इंडियाचे विमान अर्धा तास उशिराने नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी सर्व्हरमध्ये समस्या आल्यानंतर एअरलाइन्सचे तिकीट, रिशेड्युलिंग, फ्लाइटची माहिती आदी सेवांवर परिणाम झाला. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या काउंटरवरील बोर्डिंग पास आणि इतर कामे संगणक न वापरता हाताने करण्यात आली.