नागपुरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन टोळ्या अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:59 AM2020-06-18T01:59:24+5:302020-06-18T02:04:11+5:30
हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
पहिली घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगरातील आहे. येथील निंबाळकर हायस्कूलच्या बाजूला असलेल्या पडक्या घरामध्ये रात्री ११.३० च्या सुमारास काही युवक एकत्रित आले. त्यांच्याजवळ शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ६ आरोपींना शस्त्रासह रंगेहाथ पकडले. आरोपींमध्ये रोशन अशोकराव काटोले (२३, रा. सौभाग्यनगर), रुचित कृष्णराव कडू (२७), अक्षय ऊर्फ दत्तू राजेश बाळबुधे (२०), यश लक्ष्मीप्रसाद भोयर (२०), साहिल ऊर्फ दही दीर्घेश्वर दहीकर (१९, रा. इंद्रनगर), सागर ऊर्फ पिचकारी राजेंद्र महात्मे (२७, रा. ब्रह्मनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी शस्त्रासह मिरची पावडर, नायलॉन दोरी, लोखंडी रॉड, मोबाईल असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यापैकी आरोपी प्रवीण ऊर्फ चुटी चव्हाण (२३, रा. दुबेनगर) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
दुसरी घटना कळमना हद्दीतील कामठी रोडवर घडली. पॅट्रोलिंग करताना पोलिसांना रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका बसमध्ये हालचाल होताना दिसून आली. येथे आरोपींजवळ लोखंडी रॉड, चाकू, नायलॉन दोरी होती. पोलिसांनी येथून आरोपी हर्ष युवराज इंगोले (१८, रा. भरतवाडा रोड), स्वप्निल भीमराव मोटघरे (२७, रा. दुर्गानगर), कुलदीप ऊर्फ पैजामा सुभाष गणवीर (२५), टिपू सुल्तान अशपाक शेख (१८, रा. प्रकाशनगर) यांना अटक केली आहे. आरोपी चेतन ठाकूर, आसिफ व अन्य एक जण पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.