नागपुरातील जरीपटक्यात दोन गटात जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:25 AM2018-01-24T00:25:51+5:302018-01-24T00:26:54+5:30
दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या वादातून जरीपटक्यातील दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून एकमेकांच्या घरावर हल्ला चढवून मारहाण, तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जरीपटक्यातील गौतमनगरात सुरू झालेला हा घटनाक्रम मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चालला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या वादातून जरीपटक्यातील दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून एकमेकांच्या घरावर हल्ला चढवून मारहाण, तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जरीपटक्यातील गौतमनगरात सुरू झालेला हा घटनाक्रम मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चालला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
जरीपटक्यातील आंबेडकरनगरात राहणारा गौरव नितीन नितनवरे (वय २०) याच्यासोबत दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या मुद्यावरून रोहित पाटील, रजत नानेट, कुणाल डोंगरे यांचा सोमवारी रात्री वाद झाला. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिल्यामुळे गौरवने त्याच्या आईसह जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून मध्यरात्री ते घरी परतले. हे माहीत झाल्याने मंगळवारी पहाटे २.३० च्या सुमारास आरोपी पाटील, नानेट आणि डोंगरेने नितनवरेच्या घरावर हल्ला करून त्यांच्या घराला आग लावली. या जाळपोळीमुळे नितनवरे यांच्या घरातील साहित्य जळाले. त्याचा वचपा काढण्यासाठी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सोनू ऊर्फ अभिजित नितीन नितनवरे, गौरव नितीन नितनवरे, मल्ला ऊर्फ आयुष विनोद मेश्राम, रितीक रोशन ठवरे आणि त्यांचे दोन साथीदार हातात चाकू, तलवार घेऊन अशोक किसन पाटील (रा. लुंबिनीनगर) यांच्या घरावर चालून आले.
रोहित पाटील कहां हैं, अशी विचारणा करीत त्यांनी अशोक पाटील यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे घरात शिरून आतमधील साहित्याची तोडफोड करीत फेकाफेक केली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गौरव नितीन नितनवरे (वय २०) याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पाटीलच्या गटातील तर पाटील यांच्या तक्रारीवरून नितनवरेच्या गटातील उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला.