प्रेमसंबंधातून पत्नीला पळविले, पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न; नागपुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:17 PM2022-12-31T12:17:56+5:302022-12-31T12:20:36+5:30
दोन आरोपींना अटक : फिर्यादी ई-रिक्षाचालक गंभीर जखमी
नागपूर : ई-रिक्षा चालविणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्यानंतर तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली आहे.
मोनू ऊर्फ संतोष गौतम निकोसे (३५, सावित्रीबाई फुलेनगर) आणि बॉबी गौतम निकोसे (३२, रामबाग इमामवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सचिन नरेश धनविजय (४१, रामबाग) असे फिर्यादी ई-रिक्षाचालकाचे नाव आहे. सचिन गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता ई-रिक्षात प्रवासी घेऊन जात असताना आरोपी मोनू आणि बॉबीने दुचाकीवर येऊन सचिनला लाकडी दांड्याने डोक्यावर, पाठीवर, कंबरेवर मारून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
यातील गंभीर जखमी झालेला ई-रिक्षाचालक सचिनच्या पहिल्या पत्नीचे आरोपी मोनूसोबत दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे ती मुलीसह घरातील किमती वस्तू घेऊन मोनूसोबत पळून गेली. तेव्हापासून मोनू आणि सचिनमध्ये नेहमी खटके उडत होते. याच वादातून आरोपींनी सचिनवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी ई-रिक्षाचालक सचिनच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.