आगीत दोन घरे खाक
By admin | Published: May 1, 2016 03:08 AM2016-05-01T03:08:01+5:302016-05-01T03:08:01+5:30
भरदुपारी दोन घरांना आग लागल्याने संपूर्ण घरगुती साहित्य भस्मसात झाले. या आगीच्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले.
साहित्यांची राखरांगोळी : काटोल शहरातील घटना
काटोल : भरदुपारी दोन घरांना आग लागल्याने संपूर्ण घरगुती साहित्य भस्मसात झाले. या आगीच्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. आग लवकर नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना काटोल शहरातील हनुमाननगर येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
शहरातील हनुमाननगर येथील रामदास खडसे यांच्या घराला अचानक आग लागली. घटनेदरम्यान खडसे दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गेले होते. परंतु त्यांची ६,४ व २ वर्षांची तीन मुले घरात होती. दरम्यान, लाडगावहून घरी परत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सरिता मडके यांना खडसे यांच्या घराला आग लागल्याचे दिसले. लागलीच त्यांनी प्रसंगावधान राखत घरात अडकलेल्या तीन मुलांना घराबाहेर काढले.
काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ शेजारच्या बेबी विकास गायकवाड यांच्या घरावर उडाल्याने त्यांच्याही घराला आग लागली. या आगीमुळे गायकवाड यांच्या घरातील दोन टीव्ही संच, होम थिएटर, कपडे, गाद्या, धान्य आदी साहित्य खाक झाले. घटनेदरम्यान, बेबी गायकवाड या एकट्याच होत्या. आगीमुळे दोन्ही घरातील विविध वस्तू जळाल्याने जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले.
घटनेबाबत सूचना मिळताच नगर परिषद अग्निशमन विभाग व काटोल पोलीस घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, माजी मंत्री अनिल देशमुख, चरणसिंग ठाकूर, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, नगरसेवक किशोर गाढवे, गणेश चन्ने, श्रीकांत देवळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन विभागाचे कमलाकर वंजारी, वासुदेव शेंडे, अंबादास वरघट, पुरुषोत्तम बागडे, रामा राऊत, समीर गणवीर, गणेश राऊत यांनी आग विझविण्यासाठी मदत केली. माजी मंत्री अनिल देशमुख व चरणसिंग ठाकूर यांनी दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन करून शासकीय मदत व घरकूल योजनेतून घर देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, आ. डॉ. आशिष देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना आर्थिक मदत दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
इजनीत घर जळाले
कोदामेंढी : नजीकच्या इजनी येथे आगीमुळे घर खाक झाले. यात जीवनावश्यक घरगुती साहित्य जळाल्याने जवळपास ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. इजनी येथील रहिवासी तेजराम गणपत थोटे यांच्या घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घरगुती साहित्य जळाले. आगीच्या घटनेमुळे घरात ठेवलेले रोख ११ हजार रुपये, १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, शिलाई मशीन, सोफा, कूलर तसेच १६ क्विंटल तांदूळ खाक झाले. माहिती मिळताच तलाठी देशमुख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.