दोन तुरुंगाधिकारी निलंबित
By admin | Published: April 3, 2015 01:40 AM2015-04-03T01:40:46+5:302015-04-03T01:40:46+5:30
खतरनाक कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहातील दोन
नागपूर : खतरनाक कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहातील दोन तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आर. जी. पारेकर आणि एस. यू. महाशिखरे अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी या दोघांच्या निलंबनाचे आदेश दिले. या कारवाईमुळे लोकमतने प्रकाशित केलेल्या ‘कैदी पलायन प्रकरणात फिक्सिंग’ च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या कालावधीत बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश), शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान (वय २४, रा. मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादुर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), प्रेम ऊर्फ नेपाली शालीकराम खत्री (वय २४, रा. नेपाळ) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. राज्यातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कारागृहातील बराकीचे लोखंडी गज कापून कैदी पळून गेल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी मंगळवारी दुपारीच कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना तडकाफडकी निलंबित केले तर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेगवेगळी पथके आणि दस्तुरखुद्द अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर नागपुरात आल्या. दरम्यान, लोकमतने आज कारागृहातील कैदी प्रकरणात अधिकाऱ्यांचे फिक्सिंग असल्याचे वृत्त ठळकपणे छापले. घटनेच्या रात्री पारेकरची नाईट सर्चिंग होती,असाही त्यात उल्लेख केला. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. बोरवणकर यांनी कसून तपासणी केल्यानंतर पारेकर आणि महाशिखरे कैदी पलायन प्रकरणात दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बोरवणकर यांनी आज सायंकाळी तुरुंगाधिकारी पारेकर आणि महाशिखरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या संदर्भात लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाच्या आदेशाला दुजोरा दिला. मात्र, अधिक बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
लोकमत वृत्ताची
एसीबीकडून दखल
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील भ्रष्टाचाराच्या लोकमत वृत्ताची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी या विभागाला चौकशीचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच एसीबीने गुरुवारपासून चौकशी प्रारंभ केली आहे. लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारावर ही चौकशी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पाच कच्च्या कैद्यांच्या पलायनास कारणीभूत ठरलेल्या कारागृहातील भ्रष्टाचाराची एका हितचिंतकाने लोकमतला फोन करून इत्थंभूत माहिती दिली. लोकमतने त्याचे मनोगत ठळकपणे २ एप्रिलच्या हॅलो नागपूरमध्ये प्रसिद्ध करून कारागृहात बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.