दुर्दैवी; वीटभट्टीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:11 AM2021-06-14T10:11:53+5:302021-06-14T14:21:16+5:30
Nagpur News विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर: विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. रविवारपासून हे दोघेही बेपत्ता झाल्याने त्यांचा सर्वदूर शोध सुरू होता. मात्र त्या शोधाची अखेर अशी विदारक झाली.
आरुशी नामदेव राऊत (11) आणि अभिषेक नामदेव राऊत (8) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना नाल्याजवळील खड्ड्यात गेली असावी व तेथे अपघाताने पडली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरातील राज पांडे या 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथील दोन बहीण-भावाचे कपडे आणि चप्पल गावातील नाल्याशेजारी आढळल्याने सकाळी खळबळ उडाली होती. ही मुले रविवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार मुलांच्या आईने हिंगणा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. रात्रभर या मुलांचा शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेही मिळाले नव्हते. सकाळी हिंगणा पोलिसांचे पथक सावंगी देवळी येथे दाखल झाल्यानंतर मुलांचा नाल्यातील खड्यात सुरु केला. येथील गाळात मुलांचे मृतदेह अडकलेले आढळले.
आई कामावर गेल्याने ही मुले सकाळी घरीच होती. दुपारी खेळासाठी ती बाहेर गेली असावी असे सांगितले जात आहे.
दोन्ही मृतदेह हिंगणा पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहेत. पोलीस इतर बाजूनेही तपास करीत आहेत.