दोन लाख बेरोजगारांची फौज
By admin | Published: October 25, 2015 02:56 AM2015-10-25T02:56:44+5:302015-10-25T02:56:44+5:30
उपराजधानीत ‘स्मार्ट सिटी’चे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याचवेळी भविष्यातील या ‘स्मार्ट सिटीत’ १ लाख ९० हजार ९४५ बेरोजगार तरुणांची फौज रोजगाराच्या शोधात पायपिट करीत आहे.
उपराजधानीत हव्यात रोजगाराच्या संधी : कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा
नागपूर : उपराजधानीत ‘स्मार्ट सिटी’चे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याचवेळी भविष्यातील या ‘स्मार्ट सिटीत’ १ लाख ९० हजार ९४५ बेरोजगार तरुणांची फौज रोजगाराच्या शोधात पायपिट करीत आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय कुठलेही शहर स्मार्ट होऊ शकत नाही, हे विसरता येणार नाही. या बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, यावर विचार होणे आवश्यक आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे (पूर्वीचे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र) नोंदणीकृत या बेरोजगारांमध्ये १ लाख २७ हजार १४४ मुले व ६३ हजार ७८१ मुलींचा समावेश आहे. रोजगाराच्या संधी थेट तरुणांपर्यंत पोहोचाव्या यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे बेरोजगार तरुणांची नोंदणी केली जाते. यासाठी केंद्राने आॅनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार वयाचे १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणत्याही बेरोजगाराला या केंद्राकडे नोंदणी करता येते. यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधींची माहिती दिली जाते. त्यानुसार मागील २००८ ते २०१२ या पाच वर्षांत एकूण ३६ लाख ५ हजार ९४४ बेरोजगार तरुणांची येथे नोंदणी झाली. त्यापैकी ६ लाख ९० हजार ७२२ तरुणांना रोजगार मिळाला. दुसरीकडे या काळात मार्गदर्शन केंद्राकडे सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे १३ हजार २९५ व खाजगी क्षेत्रातील ३५ हजार ४२२ उद्योजकांची यादी उपलब्ध होती. त्याचवेळी ८३ हजार ९१५ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ४ हजार ९८० तरुणांना रोजगार मिळाला. सोबतच केंद्रातर्फे ६२१ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी ५९ हजार ८५४ तरुणांची निवड करण्यात आली होती.
शिवाय या सर्व मेळाव्यांवर सुमारे ६३ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च झाला. याच दरम्यान आदिवासी तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असून, त्यानुसार ११२ कार्यक्रम झाले. त्यासाठी ४ हजार ३०९ तरुणांची निवड करू न त्यापैकी ३ हजार ३१७ तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण करून ३४६ तरुणांना रोजगार मिळाला. (प्रतिनिधी)