दोन मोठे जमीन घोटाळे उजेडात
By admin | Published: June 17, 2017 02:12 AM2017-06-17T02:12:24+5:302017-06-17T02:12:24+5:30
भूमाफिया ग्वालबन्सी टोळीवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्यामुळे आतापर्यंत दहशतीत असलेल्या पीडितांनीही
बिल्डर, सोसायटीचे पदाधिकारी अडचणीत : गुन्हे दाखल होणार ?
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमाफिया ग्वालबन्सी टोळीवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्यामुळे आतापर्यंत दहशतीत असलेल्या पीडितांनीही आता नव्याने आवाज उठविण्याचे धाडस दाखवणे सुरू केले आहे. यामुळे भूमाफियांसोबतच काही सोसायट्या अन बिल्डरांच्याही पापांचा भंडाफोड होऊ लागला आहे. विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आलेल्या तक्रारीतून अशाच प्रकारचे दोन मोठे जमीन घोटाळे उजेडात आले आहे. लवकरच त्यासंबंधाने गुन्हे दाखल होण्याचे संकेत संबंधित वरिष्ठांकडून मिळाले आहे.
ग्वालबन्सी टोळीच्या पापाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी दोन महिन्यांपूर्वी विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती केली होती. या विशेष तपास पथकाकडे आतापर्यंत २४०० तक्रारी आल्या आहेत. त्यात भूमाफियांसोबतच लाखो, करोडोंची जमीन, भूखंड बळकावणाऱ्या काही सोसायटीचे पदाधिकारी तसेच बिल्डरांविरुद्धच्याही तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे जमीन घोटाळ्याच्या दोन मोठ्या प्रकरणावर एसआयटीने लक्ष केंद्रीत केले असून, लवकरच या खळबळजनक प्रकरणाचा कारवाईच्या रूपाने भंडाफोड होणार आहे.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दशकांपूर्वी (हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या निर्मितीपूर्वी) एका शेतीवर पडलेल्या लेआऊटमधील भूखंड विकत घेणाऱ्यांनी एकत्र येऊन एका सोसायटीची स्थापना केली. ६५९ सदस्यांच्या या सोसायटीत सारे काही नियमानुसार सुरू होते. पुढे आपसी मतभेद अन् हेवेदावे सुरू झाले. मिहान प्रकल्पाची घोषणा होताच या भागातील जमिनीचे भाव सोन्यासारखे वधारले. त्यामुळे हेवेदावे तीव्र झाले. या पार्श्वभूमीवर २००३ मध्ये सोसायटीचे नवीन संचालक मंडळ आले.
या संचालक मंडळाने मनमानी सुरू केली. अधिकार आहे की नाही, त्याला कायदेशीर आधार आहे की नाही ते तपासण्याच्या भानगडीत न पडता ६५९ पैकी ५४९ जणांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे संबंधित सदस्यांमध्ये खळबळ उडाली.
मात्र, नवीन संचालक मंडळाचे प्रमुख सर्वच क्षेत्रात प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरल्याने ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले, त्यांच्या तक्रारीकडे कुणी लक्ष दिले नाही.
सार्वजनिक जागा हडपली
दुसरे एक प्रकरण मिहानलगतच्या परिसरातील आहे. एका गृहनिर्माण सोसायटीत १०६ भूखंड होते. सुमारे १० हजार चौरस फुटाची जागा सार्वजनिक वापरासाठी सोडण्यात आली होती. सोसायटीच्या एका पदाधिकाऱ्याने त्या जागेवर १०७ क्रमांकाचा भूखंड असल्याचे कागदपत्र तयार करून ही कोट्यवधींची जागा गिळंकृत केली. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर एसआयटीने चौकशी केली. लवकरच या प्रकरणातही गुन्हा दाखल होणार आहे.
अनेक प्रकरणांची चौकशी सुरू
जमीनमालक, भूखंडधारक यांना मारहाण करून, धाक दाखवून भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीने अनेकांच्या जमिनी-भूखंडांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या जमिनी, भूखंड बळकावले. अशा पद्धतीने शेकडो कोटींची मालमत्ता जमविणाऱ्या ग्वालबन्सी टोळीचे पाप तब्बल तीन दशकानंतर फुटले. शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून ग्वालबन्सी टोळीचे साम्राज्य जमीनदोस्त केले. ग्वालबन्सी टोळीसारख्या गब्बर गुंडांवर पोलीस कारवाई करतात, हा विश्वास पटल्याने एसआयटीकडे तक्रार करणारांची गर्दी वाढली आहे. ६० दिवसात २४०० तक्रारी एसआयटीला मिळाल्या आहेत. त्यापैकी ज्या तक्रारीसोबत पुरावे जोडले आहे, त्यांची पोलीस प्राधान्याने चौकशी करीत आहेत. त्यामुळे अनेक धक्कादायक प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता संबंधित सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
१४ वर्षांनंतर बिंग फुटले
सभासदत्व रद्द केल्यानंतर या संचालकांनी स्वत:च्या प्रभावात सोसायटीची एक आमसभा घेतली. त्यात केवळ ४३ सदस्य हजर होते. त्या सभेत काही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर चार एकर जागा विकण्यात आली. या जागेची किंमत सध्या कोट्यवधी रुपये आहे. या गैरप्रकाराला त्यावेळी अनेकांनी हरकत घेतली. विरोध केला. मात्र, तो पद्धतशीर मोडून काढण्यात आला. १४ वर्षानंतर या प्रकरणाची एसआयटीकडे तक्रार झाल्यानंतर त्यातील गैरकायदेशीर बाबी उघड झाल्या. त्यामुळे आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एसआयटीकडून सुरू झाली आहे.