नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी-उमरेड मार्गावर दोन बिबट्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:49 PM2018-03-01T22:49:36+5:302018-03-01T22:49:54+5:30
बुटीबोरी-उमरेड मार्गावरील खापरी (आकरे) गावाजवळ बुधवारी सायंकाळी दोन बिबट्यांचे मृतदेह वनकर्मचाऱ्यांना आढळून आले. त्या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू मृत डुक्कर खाल्याने झाला असावा, संशय व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हल्ली वन्यप्राण्यांनी त्यांचा मोर्चा नागरीवस्तीकडे वळविला आहे. त्यातूनच पिकांच्या नुकसानीच्या प्रकारांसोबतच वन्यप्राणी शेतकरी व जनावरांवर हल्ला चढवीत असल्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. दरम्यान, बुटीबोरी-उमरेड मार्गावरील खापरी (आकरे) गावाजवळ बुधवारी सायंकाळी दोन बिबट्यांचे मृतदेह वनकर्मचाऱ्यांना आढळून आले. त्या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू मृत डुक्कर खाल्याने झाला असावा, संशय व्यक्त केला जात आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी जनार्दन डोंगळे व काही वन कर्मचारी बुधवारी खापरी (आकरे) परिसरात गस्तीवर असताना त्यांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गावाजवळ (आबादीलगत) दोन बिबट मृतावस्थेत पडले असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच या प्रकाराची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. घाडगे यांनी बुधवारी रात्री या दोन्ही मृतदेहांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. शिवाय, गुरुवारी सकाळी उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन, सहायक वनसंरक्षक एम. जी. ठेंगळी, मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. बी. एम. कडू, पशुधन अधिकारी डॉ. विलास गहुखरे, मकरधोकडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एन. काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
जवळच मृत डुकराचे अवशेष पडले होते. या बिबट्यांनी मृत डुक्कर खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली असावी आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यातील एक बिबट चार वर्षे व दुसरा सात महिने वयाचा होता. शवविच्छेदन प्रक्रिया आटोपल्यानंतर दोन्ही मृतदेहांची खापरी (आकरे) येथील स्मशानभूमीत विल्हेवाट लावण्यात आली. हे बिबट खाद्य व पाण्याच्या शोधात गावाकडे आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.