नागपुरात गोवरचा शिरकाव, २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 11:43 AM2022-12-06T11:43:22+5:302022-12-06T11:45:58+5:30

रुग्ण गांधीबाग झोनमधील : ५ आणि ८ वर्षांची मुले

Two measles patients found in Nagpur; Health department on alert | नागपुरात गोवरचा शिरकाव, २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; आरोग्य यंत्रणा सतर्क

नागपुरात गोवरचा शिरकाव, २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; आरोग्य यंत्रणा सतर्क

Next

नागपूर : मुंबई, पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही गोवर हळूहळू पाय पसरत आहे. मनपाच्या गांधीबाग झोनमधील ५ व ८ वर्षांची २ मुले गोवर पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रण सतर्क झाली आहे. या मुलांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नव्हती. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

गोवर हा कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतो. गोवर लसीबाबत गैरसमजुतीमुळे अनेक मुले लसीपासून वंचित आहेत. परिणामी, मुंबईत सुरुवात झालेल्या गोवरची साथ आता राज्यभरात पसरली आहे. मुंबईसह पुणे, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, बुलढाणा, रायगड, जळगाव, अकोला, धुळे व आता नागपुरातही गोवरचा शिरकाव झाला आहे. मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गावर्धन नवखरे यांनी सांगितले, मनपाच्या गांधीबाग झोनमधील या दोन्ही मुलांना गोवरची लक्षणे होती. १२ नोव्हेंबर रोजी दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ३ डिसेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या मुलांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नव्हती.

- जुलै महिन्यात आढळून आले होते २ रुग्ण

शहरात जुलै महिन्यात गोवरच २ रुग्ण आढळून आले. त्यानंतर ते आतापर्यंत जवळपास ११५ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील हे २ पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ४ झाली आहे.

- सर्वेक्षणात २४ संशयित रुग्ण

मनपाच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या घराघरांतील सर्वेक्षणात आतापर्यंत २४ गोवर संशयित रुग्ण सापडले आहेत. यात लकडगंज झोनमध्ये सर्वाधिक ८, धरमपेठ व धंतोली झोनमधील प्रत्येकी ५, हनुमाननगर व आसीनगरझोनमधील प्रत्येकी २ तर नेहरूनगर आणि गांधीबाग झोनमधील प्रत्येकी १ रुग्ण आहे. रुग्णालयांपर्यंत पोहोचलेल्या संशयितांचा यात समावेश नाही.

- १,७२२ मुले दुसऱ्या लसीपासून वंचित

आतापर्यंत ३ लाख ५७ हजार ६६६ घरांचे सर्वेक्षण झाले. यात ५ वर्षांखालील ९० हजार २९२ मुले आढळून आली. त्यापैकी १ हजार ७३० मुलांनी पहिली तर, १ हजार ७२२ मुलांनी दुसरी लस घेतलेली नाही. पहिली लस २ हजार ९७ आणि दुसरी लस १हजार ८६८ मुलांना देण्यात आली. ५ हजार २५६ मुलांना ‘व्हिटॅमिन ए’ पूरक आहार देण्यात आला.

Web Title: Two measles patients found in Nagpur; Health department on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.