तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:00 PM2022-05-11T13:00:37+5:302022-05-11T13:14:23+5:30
डॉक्टरने औषधोपचार करून महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला.
उमरेड (नागपूर) : तलावात अखेरच्या घटका मोजणाऱ्या एका महिलेसाठी दोन तरुण देवदूत ठरले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोन तरुणांनी तलावात उडी घेतली व बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. अविनाश बालपांडे आणि रोशन वडपल्लीवार अशी या दोन तरुणांची नावे आहेत. त्यांच्या या जिगरबाज कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास उमरेड येथील हिरवा तलाव येथे घडली.
अविनाश बालपांडे या तरुणाचे हिरवा तलावानजीक घर आहे. त्याच्या घरी पेटिंगचे काम सुरू होते. काम करणारे कारागीर सुधाकर लिचडे आणि अन्य काहीजण हिरवा तलाव परिसरात गेले होते. अशातच त्यांना एक महिला तलावात दिसून आली. लगेच अविनाश बालपांडे याला ही बाब सांगण्यात आली. पाठोपाठ रोशन वडपल्लीवारसुद्धा पोहोचला. त्यांनी उमरेड पोलीस ठाण्यात याबाबतची सूचना दिली. यावेळी सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली होती.
पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला उशीर लागेल, या विचाराने अविनाश आणि रोशन या दोघांनी तलावात उडी घेतली व मोठ्या शिताफीने महिलेला सहीसलामत तलावाच्या किनाऱ्यावर आणले. ती बेशुद्धावस्थेत निपचित पडली होती. लगेच महिलेला उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. यासाठी निखिल पंधरे, प्रफुल्ल बालपांडे, सुधाकर लिचडे यांनी अविनाश आणि रोशनला मदत केली.
डॉक्टरने औषधोपचार करून महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्याकडे विचारणा केली असता, सदर महिलेने पाय घसरून तलावात तोल गेल्याचे सांगितल्याची माहिती दिली.
जिगरबाज रोशन
हिरवा तलाव परिसरात वास्तव्य असलेला रोशन वडपल्लीवार याने यापूर्वीही अनेकांचे प्राण वाचविले आहे. यानिमित्ताने रोशनने केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हिरवा तलाव परिसराला लागूनच लोकवस्ती आहे. ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी सुरक्षात्मक व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.