तो दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्हच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:49 AM2020-05-17T00:49:36+5:302020-05-17T00:55:12+5:30
आई पॉझिटिव्ह तर दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह होता. चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान एका निवासी डॉक्टरने स्वीकारले. त्या मातेचे समुपदेशन करीत तिला आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. परंतु १४ दिवसांनंतर त्या मातेचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला. आणखी काही दिवस तिला रुग्णालयात राहावे लागणार होते. परंतु त्या डॉक्टरने व मातेने हार मानली नव्हती. अखेर आज त्या महिलेचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. सलग २० दिवस पॉझिटिव्ह मातेजवळ राहूनही चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्यास त्या दोघांनाही यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आई पॉझिटिव्ह तर दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह होता. चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान एका निवासी डॉक्टरने स्वीकारले. त्या मातेचे समुपदेशन करीत तिला आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. परंतु १४ दिवसांनंतर त्या मातेचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला. आणखी काही दिवस तिला रुग्णालयात राहावे लागणार होते. परंतु त्या डॉक्टरने व मातेने हार मानली नव्हती. अखेर आज त्या महिलेचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. सलग २० दिवस पॉझिटिव्ह मातेजवळ राहूनही चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्यास त्या दोघांनाही यश आले. त्या मातेच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भावर तर डॉक्टरच्या चेहऱ्यावर समाधान होते.
सतरंजीपुरा येथील त्या महिलेच्या कुटुंबाला सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन केले होते. दोन महिन्यांच्या चिमुकल्यासह तिचा व पतीचा नमुना तपासण्यात आला. अहवालात मात्र तिचा एकटीचा नमुना पॉझिटिव्ह आला. २८ एप्रिल रोजी त्या मातेला व तिच्या दोन महिन्याच्या चिमुकल्याला मेयोत दाखल केले. परंतु मुलाला सोबत ठेवता येणार नाही, असे सांगून चिमुकल्याला क्वारंटाईन असलेल्या पतीकडे पाठविले. त्या दिवशी तो चिमुकला दिवसभर दुधासाठी रडला. याची माहिती पतीने पत्नीला फोनवरून दिली. त्या मातेने याची माहिती डॉ. बन्सल यांना देऊन बाळाला सोबत ठेवण्याची विनंती केली. त्या चिमुकल्याला आणखी तिसरी व्यक्ती पाहण्यासाठी नव्हती. डॉ. बन्सल यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. ते बाळ निगेटिव्ह ठेवण्याच्या अटीवर वरिष्ठांनी परवानगी दिली. डॉ. बन्सलनी त्या मातेला कोरोनाची माहिती दिली. शरीराची, कपड्याची स्वच्छता कशी राखायचे ते सांगितले. एवढ्यावरच ते थांबले नाही स्वत:च्या पैशातून टॉवेलपासून ते साबण, सॅनिटायझर आणून दिले. विशेषत: दूध पाजताना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आणि नंतर तिच्याकडे बाळ सुपूर्द केले. डॉ. बन्सल आणि त्या मातेने बाळला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान स्वीकारले होते. यामुळे आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात होती. १४ दिवसानंतर त्या मातेचे नमुने तपासण्यात आले. परंतु तिचा पहिला नमुना निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. यामुळे पुन्हा काही दिवस रुग्णालयात काढावे लागले. मात्र दोघांनी हार मानलेली नव्हती. पाचव्या दिवशी तपासलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्या महिलेला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोन महिन्याच्या बाळाला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान पूर्ण केल्याने डॉ. बन्सल यांना आपले कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान होता. डॉ. बन्सल यांना या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवी चव्हाण व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सहकार्य केले.