दाभोळकर, पानसरेंच्या हत्येप्रकरणी आणखी दोन नावे समोर - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 08:30 PM2018-07-18T20:30:34+5:302018-07-18T20:31:30+5:30

दोन्ही हत्येतील सूत्र सारखेच 

Two more accused in the murder case of Dabholkar, Pansar murder - Chief Minister | दाभोळकर, पानसरेंच्या हत्येप्रकरणी आणखी दोन नावे समोर - मुख्यमंत्री

दाभोळकर, पानसरेंच्या हत्येप्रकरणी आणखी दोन नावे समोर - मुख्यमंत्री

googlenewsNext

नागपूर : विचारवंत नरेंद्र दाभोळकरगोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सारंग आकोलकर व विनय पवार या आणखी दोन आरोपींची नावे समोर आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत याची माहिती दिली. संबंधित दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

नियम २९३ च्या विरोधकांच्या प्रस्तावावर कायदा आणि सुव्यवस्थेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, या हत्येचा तपास सीबीआय व कर्नाटक पोलीस करीत आहेत.  त्यांना आपले पोलीस मदत करीत आहेत. या प्रकरणी समीर गायकवाड व विरेंद्र तावडे याला अटक झाली आहे.  या दोन्ही हत्येतील सूत्र सारखेच आहे. अटक झालेल्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, पुणे, मुंबईसह गुन्हे कमी झाले आहेत. नागपूरात खूना सारख्या गुन्ह्यांतही कमतरता आली आहे. दोषसिद्धीचे प्रमाण वाढले असून ते ५३ टक्के आहे.  देशात आपले राज्य दखलपात्र गुन्ह्यात १३ व्या क्रमांकावर, खूनात १६, बलात्कार १५, फसवणूक १२ व्या क्रमांकावर आहे.  आॅपरेशन मुस्कानद्वारे २० हजार ११२ हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला आहे. यात पर राज्यातील मुलेही होती ़ त्यांना पोलीसांनी त्यांच्या घरापर्यंत पोहचवले आहे. 
- पोलीसांसाठी ३४ हजार घरे तयार होत आहेत. हा आकडा  १ लाखापर्यंत घेऊन जायचा आहे.  कारण तेवढ्या घरांची कमतरता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

सिडको जमीन व्यवहार रद्द 
- सिडको जमीन व्यवहाराला स्थगिती देऊन भागणार नाही तर ते रद्द करावे, अशी मागणी जयंत पटील यांनी केली होती. यावर, विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन सिडको जमीन व्यवहार रद्द करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या जमिनीचे पैसे शेतकºयांना मिळाले आहेत. व्यवहार रद्द झाले तर पैसे दुसºयांचेच बुडतील. त्यामुळे काही फरक पडत नाही, असेही त्यांनी सांगितले.

 आॅनलाईन शस्त्रे पुरविणा-या ‘फ्लिपकार्ट’वर कारवाई 
- औरंगाबाद दंगलीनंतर फ्लिपकार्टवर आॅनलाईन आॅर्डर देऊन तलवारी, कुकरी अशी शस्त्रे खरेदी करण्यात आली व त्याचा पुरवठाही करण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिसांना वेळीच याची माहिती मिळाल्याने शस्त्रे पकडण्यात आली. मात्र, हे प्रकार गंभीर आहेत. त्यामुळे आॅनलाईन शस्त्रे पुरवठा केल्या प्रकरणी फ्लिपकार्टसह आॅनलाईन आॅर्डर देणारे व पुरवठा करणारी कंपनी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मोबाईल चोरी व आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ
- मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. पूर्वी मोबाईलचे गुन्हे हरवलेले म्हणून नोंदवले जायचे, आता चोरी म्हणून नोंदवले जातात. त्यामुळे मोबाईल चोरीचे २२०० गुन्हे वाढले आहेत. 
- क्रेडीट कार्ड फसवणूकचे गुन्हे वाढत आहेत. मागील वर्षी १५२२ गुन्हे घडले, १२२ उघडकीस आणले. बलात्काराचे ९३.४६ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. 
-राज्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत १६ गुन्हे वाढले आहेत. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे कामही सुरू आहे. यात ३९८ कोटींची मालमत्ता आतापर्यंत वसुल करण्यात आली आहे. 

Web Title: Two more accused in the murder case of Dabholkar, Pansar murder - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.