विमानतळावर आणखी दोन एक्स-रे मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:17+5:302021-07-10T04:07:17+5:30
नागपूर : कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पालन करताना सोशल डिस्टन्सिंग, प्रवाशांची सुरक्षा, काळजी आणि खबरदारी घेण्याच्या उद्देशाने मिहान इंडिया ...
नागपूर : कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पालन करताना सोशल डिस्टन्सिंग, प्रवाशांची सुरक्षा, काळजी आणि खबरदारी घेण्याच्या उद्देशाने मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिक्युरिटी होल्ड एरियात (एसएचए) जास्त जागा उपलब्ध करून देताना आणखी दोन नवीन एक्स-रे मशीन लावल्या आहेत. पूर्वीच्या तीन मशीनसह आता पाच मशीन उपलब्ध झाल्या आहेत.
‘एसएचए’ हे एक निर्जंतुकीकरण क्षेत्र असून सुरक्षा तपासणीनंतर प्रवासी विमानात चढण्याची प्रतीक्षा करतात. नवीन एसएचए क्षेत्र अधिक प्रशस्त झाल्याने प्रवाशांना सामाजिक अंतर राखून कोविड प्रोटोकॉलचे पालन कटाक्षाने करता येईल.
विमानतळाचे संचालन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मिहान इंडिया लिमिटेडतर्फे (एमआयएल) करण्यात येते. एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी मिहान प्रकल्पाला भेट देऊन विमानतळाची विकास कामे आणि देखरेख कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सिक्युरिटी होल्ड एरियाच्या आधुनिकीकरणावर समाधान व्यक्त केले. विमानतळावर प्रवासीकेंद्रित सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश एमआयएलच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
एमआयएल ऑगस्ट २००९ पासून विमानतळाचे संचालन करीत आहेत. प्रवाशांच्या सुविधेत वाढ आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी कंपनी प्रयत्नरत आहे. याशिवाय जागतिक दर्जाच्या अद्ययावत मॉडेल सुविधा देण्याची इच्छा आहे. कोरोना काळात विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेण्यात येते.