कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:09 AM2023-04-28T11:09:11+5:302023-04-28T11:09:36+5:30
पर्यावरण संवर्धनाबाबत खोटे दावे
आशिष रॉय
नागपूर : पॅरिस करारात भारत वर्ष २०३०पर्यंत ५० टक्के वीज उत्पादन नॉन-जीवाश्म इंधनावर (नॉन-फॉसिल फ्यूएल) आधारित प्रकल्पातून करेल, असा उल्लेख आहे. त्यानंतरही महाजनकोने कोळशावर आधारित वीज उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नागपूर सीमेपासून ४ किमी अंतरावर कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर शहर आधीच कोराडी आणि खापरखेड वीज केंद्रामुळे वायू प्रदूषणाचा सामना करीत आहे. आता दोन नवीन वीज उत्पादन युनिट स्थापन करण्याचा निर्णय महाजनकोने घेतल्यामुळे आता नागपूर शहर गॅस चेंबर बनण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, असे म्हटले जात आहे. महाजनकोने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) दोन युनिटच्या पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज केला आहे. मंडळाने दि. २९ मे रोजी या संदर्भात जनसुनवाई घेण्याचे ठरविले आहे. उद्योग भवनातील मंडळाच्या कार्यालयात या संदर्भात सादर केलेला प्रस्ताव उपलब्ध आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) महाजनकोला वर्ष २०१० मध्ये कोराडीच्या ६६० मेगावॉट क्षमतेच्या तिन्ही युनिटमध्ये फ्ल्यू गॅस डिसल्फ्युरिझर्स (एफजीडी) बसविण्याचे निर्देश दिले होते. कंपनीने आतापर्यंत एफजीडी बसविले नाहीत. आता महाजेनकोने दोन्ही प्रस्तावित युनिटमध्ये एफजीडी तत्काळ बसविण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्याच्या कोराडी प्रकल्पातील युनिटला १०० टक्के राखेची विल्हेवाट लावण्यावर यश आले नाही. गेल्या पाच वर्षांत हा आकडा सरासरी ८० टक्के आहे. आता महाजनकोने नवीन युनिटमधून निघणाऱ्या राखेचा उपयोग १०० टक्के करण्याचे आश्वासन दिले आहे. कोराडी केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे राख कन्हान नदीच्या पाण्यात मिसळते आणि पावसाळ्यात प्रकल्पालगतच्या शेतात वाहून जाते. ही नदी नागपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहे.
नवीन युनिट्सचा सर्वात मोठा तोटा वायू प्रदूषण आहे. महाजनकोच्या सल्लागाराने प्रकल्पाजवळ आठ ठिकाणी प्रदूषणांचे मोजमाप केले आणि त्याची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा चांगली आढळली. हे कार्य वर्ष २०२२च्या मार्च आणि मे महिन्यात करण्यात आले होते. पर्यावरणवाद्यांनी महाजनकोच्या आकड्यांना आव्हान देताना हे कार्य डिसेंबर आणि जानेवारी व्हायला हवे होते, असे म्हटले आहे.
विशेष बाबी
- कोराडी केंद्राने १३ वर्षांत एफजीडी स्थापन केले नाही. आता महाजनकोने हे कार्य तत्काळ करण्याचे आश्वासन दिले आहे.
- कोराडी प्रकल्पात सध्या ८० टक्के राखेचा उपयोग होत आहे. आता नवीन युनिटसाठी १०० टक्के उपयोगाचा दावा केला आहे.
- कोराडी कोळसा वीज केंद्र नागपूर मनपाच्या सीमेपासून केवळ ४ किमी अंतरावर आहे.
- वायू प्रदूषणानंतरही कंपनीने सर्वकाही आटोक्यात असल्याचा दावा केला आहे.