नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

By नरेश डोंगरे | Published: April 14, 2024 08:32 PM2024-04-14T20:32:05+5:302024-04-14T20:32:12+5:30

प्रवाशांच्या गैरसोयीची अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : दिल्ली बोर्डाकडे प्रस्ताव, आठवडाभरात सुरूवात

Two new trains from Nagpur to UP, Bihar | नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यूपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांची कुचंबना होत असल्याचे सचित्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिर्षस्थ पातळीवरून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, नागपूरहूनच थेट यूपी, बिहारकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला असून तसा प्रस्ताव दिल्ली बोर्डाकडे पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे.

दक्षिणेकडून येणाऱ्या आणि यूपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत नागपूर स्थानकावरून मोठ्या प्रमाणात चढणाऱ्या प्रवाशांची भर पडत आहे. पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या डब्यात शिरून एका पायावर प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे जनरल तर सोडा, स्लिपर आणि एसी कोच मधील प्रवाशांनाही त्रास होऊ लागला आहे.  कोचमधील स्वच्छतागृहाजवळ प्रवासी दाटीवाटीने उभे राहत असल्याने कन्फर्म तिकिट घेऊन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची तीव्र कुचंबना होत आहे.

विशेष म्हणजे, तिकिट असूनही अनेक प्रवासी (ज्येष्ठ नागरिक) आपल्या आसनापर्यंत पोहचण्याचे सोडा, कोचमध्येही शिरू शकत नाही, अशी स्थिती आहे. शनिवारी नागपूर स्थानकावरून संघमित्रा एक्सप्रेसच्या एस-४ मध्ये शिरू पाहणाऱ्या अशाच एका दाम्पत्याला अनधिकृत प्रवाशांनी कोचमधून फलाटावर ढकलून दिले. त्यांचे सामानही फेकून दिले. अशाच प्रकारे प्रचंड गर्दीमुळे अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये रविवारी शेगाव येथील एका कुटुंबातील काही सदस्य डब्यात शिरू शकले तर काही फलाटावरच राहून गेले. गर्दीमुळे प्रवाशांची होत असलेली कुचंबना लक्षात आल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील शिषर्स्थ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी नागपूर स्थानकावरून किमान दोन नवीन गाड्या पटना, दानापूर, बनारस, लखनऊकडे सोडण्याची व्यवस्था करण्याची विनंती या अधिकाऱ्यांनी दिल्ली रेल्वे बोर्डाला केली आहे. दिल्ली स्तरावरूनही या विनंती वजा मागणीवर सकारात्मक विचार सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमतला सांगितले आहे. लवकरच निर्णय होऊन या आठवड्यात एक नवीन रेल्वे गाडी सुरू होईल, अशी अपेक्षा मित्तल यांनी व्यक्त केली आहे.

प्रवाशांबाबत संवेदनशिल वर्तन ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
शनिवारी संघमित्रा एक्सप्रेसमध्ये घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. कुण्या प्रवाशांसोबत कुठे अन्याय झाला असेल तर त्याची संवेदनशिलपणे दखल घ्या. संबंधित प्रवाशांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक देऊन त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करा, असेही या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.

Web Title: Two new trains from Nagpur to UP, Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.