कोराडी येथे ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:14 AM2019-03-02T00:14:15+5:302019-03-02T00:15:31+5:30
महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या युनिटची जागा घेणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या युनिटची जागा घेणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ३५ वर्षे जुने झालेले वीज युनिट सुपर क्रिटीकल युनिटमध्ये परावर्तित करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाच पालन करीत कोराडी येथे नवीन युनिट तयार केले जात आहे. त्यांनी सांगितले की, कोळसा वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने चंद्रपूरच्या नागभीड येथून कोराडीपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे लाईन टाकण्यासाठी १७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. दीड वर्षात ही लाईन तयार केली जाईल. सध्या नागभीडवरून कोळशाची रॅक बुटीबोरी मार्गे येथे येते. यात २२ तास लागतात. थेट रेल्वे लाईनमुळे हे अंतर केवळ ४ तासाचे होईल.
तसेच बावनकुळे यांनी कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठ्यासाठी नवीन योजनांचीही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी वेकोलि पाणी उपलब्ध करेल. यासंदर्भात दोघांमध्ये करार झाला आहे. त्याचप्रकारे कोराडीला पाणी उपलब्ध करण्यासाठी पिवळ्या नदीतील पाण्याचा उपयोग केला जाईल. यासाठी उप्पलवाडी येथून कोराडीसाठी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या माध्यमातून पिवळ्या नदीतून कोराडी औष्णिक वीज केंद्राला ६० एमएलडी पाणी मिळेल.
४७ लाख कृषी पंप सोलरशी जुळतील
बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर लक्ष केंद्रित केले आहे. या अंतर्गत राज्यातील ४७ लाख कृषी पंपांना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर आणले जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेलाही प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र राज्य हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात देशात सर्वात पुढे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज्यात १५०० मेगावॅट सौर ऊर्जा, ३५० मेगावॅट पवन ऊर्जा, १००० मेगवॅट क्षमतेचे कोजेन प्रोजेक्ट आहेत. त्याचप्रकारे इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी राज्यात र्चाजिंग स्टेशन स्थापित केले जात आहे.