दोन नवजात तर दोन उपजत बालकांचा मृत्यू
By admin | Published: September 29, 2014 01:05 AM2014-09-29T01:05:02+5:302014-09-29T01:05:02+5:30
बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज
डागातील घटना : नातेवाईकांमध्ये रोष
नागपूर : बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज रविवारी दोन नवजात तर दोन उपजत (गर्भातच) बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने बाळांचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अमलात आणल्या आहेत. महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृतीवरही लाखो रुपये खर्च केले जात आहे. गर्भवती महिलाही सुरुवातीपासून शासकीय रुग्णालयांमधून तपासण्या करून घेत आहेत, तरी देखील बालमृत्यू थांबविण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे आजच्या प्रकरणातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे डागा रुग्णालयात महिन्याचा बालमृत्यूचा दर ६ ते ८ टक्के एवढा आहे. यात उपजत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे असल्याची माहिती आहे.
डागा रुग्णालयात सध्याच्या स्थितीत १७५ रुग्ण भरती आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी लागोपाठ दोन नवजात शिशू दगावले. यातील एकाचे वजन १.६ तर दुसऱ्याचे वजन १.७ एवढे होते. शिशूचे वजन कमी असल्याने ते दगावल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ही घटना शांत होत नाही तोच दोन गर्भवती महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली. इतर गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत बाळांच्या काही नातेवाईकांनी यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे तर काहींनी, सुरुवातीपासून याच रुग्णालयातून उपचार घेत असताना ही वेळ आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)