श्रीसूर्याचे आणखी दोन एजंट अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 03:25 AM2016-01-13T03:25:33+5:302016-01-13T03:25:33+5:30

गुंतवणूकदारांना कोट्यवधीने गंडा घालणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या आणखी दोन एजंटांना आर्थिक गुन्हे पथकाने अटक करून त्यांचा एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी ...

Two other agents of Sri Sri are stuck | श्रीसूर्याचे आणखी दोन एजंट अडकले

श्रीसूर्याचे आणखी दोन एजंट अडकले

Next

विशेष न्यायालय : १६ जानेवारीपर्यंत पीसीआर
नागपूर : गुंतवणूकदारांना कोट्यवधीने गंडा घालणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या आणखी दोन एजंटांना आर्थिक गुन्हे पथकाने अटक करून त्यांचा एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयातून १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.
भूषण प्रभाकर पाटील (४१) रा. टाकळी सीम, सत्कार अपार्टमेंट दुबे ले-आऊट आणि सुशील मुरलीधर अरासपुरे (३३) रा. जुनी अजनी एफसीआय गोदामामागे, अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना सोमवारच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली.
यापूर्वी श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी जोशी, बिझिनेस असोसिएट (एजंट) निशिकांत मायी, श्रीकांत प्रभुणे, दिलीप डांगे, नितीन केसकर, मोहन पितळे, मुकुंद पितळे, शंतनू ऊर्फ विवेक कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार, मनोज तत्वादी आणि कौस्तुभ सुधीर मुकटे यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
२४ जुलै २०१५ रोजी दाखल पुरवणी दोषारोपपत्रात एकूण ८२ जणांना संशयित आरोपी म्हणून संबोधण्यात आलेले आहे. एजंटांनी कंपनीकडून ३ ते ७ टक्के आकर्षक दलाली स्वीकारलेली आहे. भूषण पाटील आणि सुशील अरासपुरे यांनी श्रीसूर्याचे बिझिनेस असोसिएट म्हणून काम करताना लाखो रुपयांचे कमिशन स्वीकारून गुन्ह्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
या दोघांनी श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीला किती ठेवीदार मिळवून दिले. या मोबदल्यात किती कमिशन घेतले, कमिशनमधून कोणत्या मालमत्ता खरेदी केल्या, याबाबत तपास अधिकाऱ्याने विचारणा केली असता, ते माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. आरोपींपैकी अरासपुरे याने तीन-चार वर्षे श्रीसूर्यामध्ये नोकरीही केली आहे.

आर्थिक गुन्हे पथकाकडे सात तक्रारी

नागपूर : कंपनीच्या ठेवीबाबतच्या योजना बेकायदेशीर असतानाही त्याने ठेवीदारांना ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले. याबाबत त्याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे पथकाला सात तक्रारी प्राप्त झालेल्या असून, फसवणूक झालेली रक्कम ४७ लाख १९ हजार रुपये आहे. त्याने बिझिनेस असोसिएट म्हणून काम करताना सूत्रधार समीर जोशीकडून नऊ लाख आठ हजार रोख आणि १ लाख १३ हजाराचे चेक प्राप्त केल्याचे समजले असल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले.
आरोपी भूषण पाटील याने २०१० ते २०१३ या दरम्यान ७०-८० गुंतवणूकदारांना कंपनीत ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले आहे. आतापर्यंत ६ ठेवीदारांनी त्याच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. फसवणुकीची रक्कम ९८ लाख २५ हजार रुपये आहे. त्याने रोख रकमेच्या स्वरूपात २६ लाख ९४ हजार आणि चेकच्या स्वरूपात ७५ हजार ९५० रुपये दलाली प्राप्त केली आहे. २०१३ मध्ये कंपनीची नाजूक परिस्थिती असताना राजेश चौधरी याला त्याचे घर विकण्यास प्रवृत्त केले आणि ३२ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या आरोपीने प्राप्त केलेल्या कमिशनमधून वानाडोंगरी येथे उच्च किंमतीचे दोन प्लॉट खरेदी केले. भुसावळ आणि नागपुरात वडील, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावे फ्लॅट आणि शेती खरेदी केली, याबाबत सखोल तपास करणे असून आरोपींचा ७ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे न्यायालयात उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two other agents of Sri Sri are stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.