नागपुरात व्हेंटिलेटरअभावी दोन रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:38 PM2018-11-27T23:38:35+5:302018-11-27T23:39:23+5:30
मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर कदाचित दोघांचाही जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर कदाचित दोघांचाही जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
युवराज यादवराव वैतागे (५५) रा. वैतागे भवन, महाल व मोरेश्वर धवंडे (४६) रा. नागपूर अशी मृतांची नावे आहेत. युवराज यांना अमरावतीहून सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास मेडिकल रुग्णालयातील वार्ड क्र. २६ मध्ये भरती करण्यात आले. त्यांना ‘प्लाझ्मा’ देण्यात आला. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासाची (व्हेन्टिलेटर) गरज होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले. परंतु, व्हेन्टिलेटर नसल्यामुळे डॉक्टरांनी नाईलाजाने ‘बॅग अॅण्ड मास्क व्हेन्टीलेशन’मधून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यास सांगितले. मात्र दुपारी प्रकृती खालवल्याने दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी युवराज यांना मृत घोषित केले. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात मोरेश्वर धवंडे भरती होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. मोरेश्वर यांनाही व्हेन्टिलेटरची गरज होती. व्हेन्टिलेटर मिळाले असते तर त्यांचाही जीव वाचला असता, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.