नागपूर जिल्ह्यातील गोंडेगाव कोळसा खाणीत दोघांचा दबून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:19 PM2018-10-23T23:19:52+5:302018-10-23T23:20:56+5:30
चोरी करण्यासाठी सहा ते सात जण बंद असलेल्या कोळसा खाणीत शिरले. मात्र, कोळशाचा मोठा दगड अंगावर कोसळल्याने दोघेही त्याखाली दबल्या गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडेगाव कोळसा खाणीत घडली असून, मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कन्हान) : चोरी करण्यासाठी सहा ते सात जण बंद असलेल्या कोळसा खाणीत शिरले. मात्र, कोळशाचा मोठा दगड अंगावर कोसळल्याने दोघेही त्याखाली दबल्या गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडेगाव कोळसा खाणीत घडली असून, मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रितेश भीमराव चौरे (२५, रा. रमानगर, कामठी) व सतीश केशव देशमुख (३५, रा. बीबी कॉलनी, कामठी) अशी मृतांची नावे आहेत. वेकोलिची गोंडेगाव कोळसा खाण काही वर्षांपासून बंद असून, तिथे कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री काही चोरट्यांनी कोळसा चोरून नेण्यासाठी खाणीत प्रवेश केला. त्यांनी खाणीतील एफएस-४ या खुल्या भागात कोळसा खोदून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोळशाचा मोठा दगड कोसळला.
रितेश व सतीश दगडाखाली दबल्या गेले. त्यामुळे त्यांच्या साथीदारांनी लगेच पळ काढला. येथील सुरक्षा रक्षकांना दोघेही दबले असल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
चोरट्यांची संख्या शेकड्यात
बंद असलेल्या गोंडेगाव इंदर कॉलनी कोळसा खाणीतून गोंडेगाव, घाटरोहणा, जुनी कामठी व कामठी येथील शेकडो चोरटे रोज कोळसा चोरून नेतात. त्यात महिलांचाही समावेश आहे. हे चोरटे पोत्यात कोळसा भरून ती पोती डोक्यावर किंवा दुचाकीवर ठेवून नेतात. या चोरीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला होता. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ व मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
वाढदिवस साजरा करण्यासाठी
या प्रकरणातील मृत रितेश चौरे याचा मंगळवारी वाढदिवस होता. रितेशने दुसऱ्या खेपेत कोळसा काढल्यानंतर तो विकून मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्याची योजना आखली होती.
वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल
वेकोलिने खदान परिसरात सुरक्षाकर्मी तैनात केले आहेत. असे असतानाही येथून काही लोक कोळशाची चोरी करतात. यासोबतच या परिसरात उभ्या असलेल्या ट्रक आणि मशीनमधून डिझेलच्या चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. वेकोलिचे सुरक्षा अधिकारी केवळ चोरीच्या घटनांची नोंद घेऊन कागदी खानापूर्ती करतात. सुरक्षा व्यवस्थेवर लाखो रुपये खर्च होत असताना चोरीचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याने वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल होत आहे.