उपराजधानी हादरली; कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:38 PM2022-12-20T15:38:28+5:302022-12-20T15:39:55+5:30
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला नागपूरच्या गुन्हेगारांची सलामी
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत पोलिसांचा कडक सुरक्षा बंदोबस्त असताना दारू तस्करीच्या टोळीयुद्धातून दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर-अमरावती मार्गावरील वडधामना येथे सोमवारी सकाळी घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलिस यंत्रणेची भंबेरी उडाली आहे.
महेश उर्फ सलमान गजभिये (१९) आणि योगेश मेश्राम (३०, दोघे रा. भिवसनखोरी) अशी मृतांची नावे आहेत. सलमान आणि योगेश दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. सलमानविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल होता. योगेशलाही तडीपार करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचाही भिवसनखोरीत अवैध दारूचा अड्डा होता. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी भिवसनखोरीचा दारू अड्डा कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीत हलविला होता.
दारूमाफिया भिवसनखोरीऐवजी गोंडखैरी परिसरात दारूभट्ट्या चालवित आहेत. येथून दारू घेऊन भिवसनखोरीत भेसळ करून विकण्यात येत होती. या हत्याकांडातील आरोपीसुद्धा अवैध दारूच्या धंद्यात आधीपासूनच सक्रिय आहेत. दारू तस्करीवरून सलमान आणि योगेशचा प्रतिस्पर्धी कुख्यात आरोपी अब्बाससोबत आधीपासूनच वाद सुरू होता. अब्बासने सलमानच्या चेहऱ्यावर वस्तऱ्याने हल्लाही केला होता. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांचा काटा काढण्याची धमकी देत होते. सलमान आणि योगेश सोमवारी पहाटे बाइकवरून दारू आणण्यासाठी गोंडखैरीला गेले होते. त्याची अब्बासला भणक लागली. तो आपले साथीदार रितिक नाईक, बोंडा आणि दीपक बिसेन सोबत कारने (क्र. एमएच ०१ एआर ३५४९) त्यांचा पाठलाग करू लागला.
अमरावती मार्गावर वडधामनाजवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास कारमध्ये बसलेल्या आरोपींनी सलमान आणि योगेशच्या बाइकला धडक दिली. यात दोघेही खाली पडले. त्यानंतर आरोपींनी दोघांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह दुभाजकाजवळ सोडून आरोपी फरार झाले. काही वेळानंतर वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले. या हत्याकांडामुळे ऐन अधिवेशन काळात वाडी पोलिसांचा ताप वाढला आहे.
पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह
भिवसनखोरी आणि गोंडखैरी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूच्या भट्ट्या सुरू आहेत. या भट्ट्यांवर पोलिसांनी अनेकदा कारवाईसुद्धा केली आहे. तरीदेखील राजरोसपणे हा गोरखधंदा सुरू आहे. या हत्याकांडामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
मुठीत सापडली मिरचीपूडची पाकिटे
मृतांनी आपला जीव वाचविण्यासाठी हल्लेखोरांचा मुकाबला केल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी डोळ्यांत मिरचीपूड टाकून योगेश आणि सलमानची हत्या केली. मृतांनी त्यांच्या हातातून मिरचीपूडची पाकिटे हिसकावली. त्यामुळे मृतांच्या मुठीत मिरचीपूडची पाकिटे मिळाली आहेत.
सुरुवातीला पोलिस म्हणाले हा अपघात
वाडी पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला; परंतु मृतदेहांची अवस्था आणि घटनास्थळावरील चित्र काही वेगळेच सांगत होेते. मात्र, सायंकाळनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.