नागपुरात दोन भीषण अपघातात चिमुकलीसह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:29 AM2018-02-10T10:29:14+5:302018-02-10T10:31:28+5:30

शुक्रवारी दुपारी उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला.

Two people were killed in two horrific accidents in Nagpur | नागपुरात दोन भीषण अपघातात चिमुकलीसह दोघे ठार

नागपुरात दोन भीषण अपघातात चिमुकलीसह दोघे ठार

Next
ठळक मुद्देयशोधरानगरात तोडफोड, वाहन पेटविले धंतोलीतही तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी दुपारी उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला. अलीसबा अमरीन मोहम्मद अशरफ अन्सारी (वय ३ वर्षे) आणि नितीन जानराव राऊत (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. यशोधरानगर आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दोन वेगवेगळे अपघात घडले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यशोधरानगरात संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत वाहनाची तोडफोड करून पेटवून दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, यशोधरानगर निवासी मोहम्मद अशरफ अन्सारी हे वाहनचालक आहेत. त्यांच्या परिवारात पत्नी तसेच शिरीन कौसर आणि चिमुकली अलिसबा या दोन मुली होत्या. शिरीन घराजवळच्या शाळेत शिकायला जाते. नेहमीप्रमाणे ती शुक्रवारी शाळेत गेली. दुपारी १२.३० च्या सुमारास चिमुकली अलिसबा तिच्या शाळेत धावत धावत गेली. काही वेळेनंतर ती घराकडे परत येत असताना भरधाव वेगात आलेल्या मालवाहू वाहन क्रमांक एमएच ४९/ डी ५८९४ चा चालक शेख इसरार (वय ५०, रा. योगी अरविंदनगर) याने चिमुकल्या अलिसबाला चिरडले. ती जागीच गतप्राण झाली. त्यामुळे आरोपी वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अलिसबाचे काका मोहम्मद नफिस यांनी त्याला बाजूच्या लोकांच्या मदतीने पकडून बेदम चोप दिला. या अपघातामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने अलिसबाचा बळी घेणाऱ्या दोषी वाहन चालकाला चोप देतानाच वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर वाहनाला पेटवून दिले. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी वाहनाची आग विझवली. त्यानंतर आरोपी शेख इसरारला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.

आरोपी वाहनचालक बेधुंद
अलिसबा शाळेतून परत जात असताना शिरिनच्या शिक्षिकेने तिला थांबण्यासाठी आवाज दिला. मात्र, चिमुकल्या अलिसबाला ते कळण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरे म्हणजे, ती धावत निघाली अन् वेगात वाहन येताना दिसल्याने शिक्षिकेने चालकाला वाहन थांबवण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, बेधुंदपणे वाहन चालविणाऱ्या आरोपी इसरारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मर्यादित वेगात वाहन चालविले असते आणि शिक्षिकेच्या आरडाओरडीकडे लक्ष दिले असते तर चिमुकलीचा जीव वाचला असता.

काँग्रेसनगरात झेरॉक्स सेंटर चालकाचा बळी
असाच दुसरा अपघात काँग्रेसनगर चौकाजवळ शुक्रवारी दुपारी १.३५ वाजता झाला. प्रतापनगरातील रहिवासी नितीन जानराव राऊत यांचे झेरॉक्स सेंटर आहे. कामाच्या निमित्ताने ते शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुचाकीने (एमएच ३१/ ईएस ६१५६) धंतोलीत आले होते. काँग्रेसनगर चौकातून रहाटे कॉलनी मार्गाने ते परत जात असताना त्यांना सिमेंट काँक्रिंट मिक्सरच्या वाहनाने (एमएच ३४/ एबी ८२०४) जोरदार धडक मारली. नितीन मागच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. वातावरण तणावपूर्ण झाल्याचे कळताच धंतोलीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी नितीनचा यांचा मृतदेह मेडिकलला पाठविला. त्यांचा बळी घेणारा आरोपी वाहनचालक लखन इंगळे याला धंतोली पोलिसांनी अटक केली.

Web Title: Two people were killed in two horrific accidents in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात