भीषण अपघातात कामगाराचे दोन तुकडे; कंटेनर व ट्रकच्या मधे अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 09:57 PM2021-10-22T21:57:00+5:302021-10-22T21:57:21+5:30
Nagpur News ट्रकमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या प्रकाशात रोडचे काम करीत असताना भरधाव कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेत एका कामगाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला.
नागपूर : ट्रकमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या प्रकाशात रोडचे काम करीत असताना भरधाव कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेत एका कामगाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-कळमेश्वर मार्गावरील बोरगाव शिवारात गुरुवारी (दि.२१) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाला.
सचिन नत्थू कुंभारे (३२) असे मृत तर युवराज महादेव वानखेडे (५०) असे गंभीर जखमी कामगाराचे नाव आहे. हे दोघेही बोरगाव (बु.), ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. सध्या सावनेर-कळमेश्वर-गोंडखैरी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोघेही डीबीएल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून या कामावर कामगार म्हणून काम करायचे. ते इतर कामगारांसोबत गुरुवारी रात्री या मार्गाचे काम करीत होते. प्रकाशासाठी एमपी-३९/एच-६९६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये जनरेटर ठेवण्यात आले होते. त्या जनरेटरच्या प्रकाशात कामगार काम करीत होते.
दरम्यान, वेगात आलेल्या एमपी-१३/जीबी-१७०७ क्रमांकाच्या कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यावेळी सचिन व युवराज त्या ट्रक व कंटेनरच्या मध्ये सापडले. या धडकेत सचिनच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर युवराज गंभीर जखमी झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणला, तर युवराजला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अनिल तिवारी करीत आहेत.
मदतीला कुणी धावेना
अपघात होताच बोरगाव (बु.) येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यातच पोलिसांना सूचना देण्यात आली. त्या गदीर्तील कुणीही सचिनच्या मृतदेहास अथवा जखमी युवराजला हात लावायला तयार नव्हते. शेवटी हितेश बन्सोड यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. त्यांनी मित्रांच्या मदतीने सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेरला आणला व युवराजला नागपूरला हलविण्यासाठी मदत केली.