हृदयद्रावक! खेळाडूंच्या अंगावर कोसळली वीज; शरीर पूर्णत: भाजल्यानं दोघांचा मैदानातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:22 PM2021-09-10T20:22:15+5:302021-09-10T20:24:35+5:30
एक खेळाडू जखमी; खेळाडूवर रुग्णालयात उपचार सुरू; चनकापूर मैदानावरील घटना
खापरखेडा (नागपूर) : चनकापूर येथील मैदानावर सरावासाठी गेलेल्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. अनुज कुशवाह (२२), तन्मय दहीकर (१२) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही सावनेरमधील चनकापूर कॉलनीचे रहिवासी आहेत. सक्षम सुनील गोठीफोडे (१२) रा.पाचपावली, नागपूर असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार चनकापूर वेकोली वसाहत परिसरातील खेळाडू चनकापूर येथील मैदानावर नियमित सरावासाठी आले होते. दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. त्यावेळी मैदानावर काही मुले फुटबॉल तर काही धावण्याचा सराव करीत होती. ४.१५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुलांनी मैदानातील शेडकडे धाव घेतली. यात धावक अनुज आणि फूटबाॅलपटू तन्मय आणि सक्षम मागे राहिले. तिघेही धावत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये अनुज आणि तन्मय यांचे शरीर पूर्णत: भाजले गेले. त्यांचा मैदानातच मृत्यू झाला.
सक्षमला उपचारार्थ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुज हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होता. तन्मयच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो आणि त्याची आई त्याच्या काकाकडे चनकापूर येथे राहत होते. सक्षम हा नागपूरला राहतो. त्याच्या आजीचे निधन झाल्याने तो चनकापूर येथे आजोबांकडे आला होता. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत खेळाडूंचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. मृतांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती सावनेरचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.