रोजगाराच्या शोधात आलेल्या तरुणीवर दोघांचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:01+5:302021-05-01T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामाच्या शोधात आपल्या गावाहून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर ऑटो चालकासह दोघांनी बलात्कार केला. दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामाच्या शोधात आपल्या गावाहून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर ऑटो चालकासह दोघांनी बलात्कार केला. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार तरुणीने गुरुवारी सायंकाळी कपिलनगर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री अटक केली. मोहम्मद शहाबाज इस्माईल शेख (वय २७, कामठी) आणि मोहम्मद सलीम शेख (वय २७, कामगार नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रार करणारी तरुणी (वय २१) कन्हान आणि पारशिवनीच्या मध्ये असलेल्या एका खेड्यात राहाते. ती बारावी शिकलेली असून रोजगार शोधण्यासाठी नेहमी नागपूरला येत जात होती. आरोपी शहबाज हा कामठी ते नागपूर ऑटो चालवतो. त्याच्या ऑटोत नेहमी येत असल्याने तरुणीची त्याच्याशी ओळख होती. २१ जानेवारीला ती काम शोधण्यासाठी गांधीबागमध्ये आली होती. यावेळी तिचा मोबाईल हरवला. २५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ती आरोपी शहाबाजच्या ऑटोतून नागपूरला येत असताना तिने त्याला आपला मोबाईल हरवल्याचे सांगितले. त्याने तिचा मोबाईल शोधून देतो, असे सांगून तिला नागपुरात फिरवले. खाणे-पिणेही केले. त्यानंतर रात्र झाल्यामुळे तरुणीने गावाला जाण्याऐवजी नागपुरातच मुक्काम करण्याची इच्छा बोलून दाखविली. ती स्वतः मुक्काम करण्याची तयारी दाखवत असल्यामुळे शहाबाजची नियत फिरली. त्याने त्याचा मित्र आरोपी सलीम शेख याला बोलावून मुक्कामासाठी जागा शोधायला सांगितले. सलीमने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव कामठी मार्गावरील एका टिनाच्या घरात या दोघांना नेले. तेथे शहाबाज आणि सलीमने त्या तरुणीवर रात्रभर बलात्कार केला. तिला दुसऱ्या दिवशी सकाळी कन्हानला सोडून दिले. दरम्यान, या घटनेला दोन महिने झाले. गुरुवारी सकाळी मुलीचे विचित्र वर्तन पाहून तिच्या आईने तिला खोदून खोदून विचारले असता आरोपी शहाबाज तसेच सलीमने दोन महिन्यांपूर्वी रात्रभर बलात्कार केल्याची माहिती तिने आईला दिली. परिणामी तरुणीची आई तिला कपिलनगर पोलीस ठाण्यात घेऊन आली. येथे तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी शहाबाज तसेच सलीमविरुद्ध तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यांना रात्रीच अटक करण्यात आली.
----
यापूर्वीही घडल्या घटना
बाहेरगावच्या मुली अथवा महिलेवर ऑटोचालकांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या अनेक घटना नागपूर शहरात यापूर्वी घडल्या आहेत. बाहेरगावच्या तरुणी अथवा महिलांची असहाय्यता लक्षात घेऊन आरोपी ऑटोचालक मदत करण्याच्या नावाखाली त्यांना निर्जन ठिकाणी नेतात. तेथे त्यांच्यावर साथीदारांसह बलात्कार करतात आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडतात. पीडित महिला अथवा मुलगी बाहेरगावची असल्यामुळे त्यांना घटनास्थळासंबंधी माहिती नसते. बदनामीच्या धाकाने त्या पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची नोंद होत नाही. नागपुरात यापूर्वी सीताबर्डी, हिंगणा, भिलगाव, कामठी, जरीपटका अशा अनेक भागात ऑटो चालकांनी बाहेरगावच्या महिला, मुलींवर बलात्कार केल्याचे गुन्हे घडले आहेत.