दोन सख्ख्या बहिणींच्या खुनात आरोपीला दुहेरी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:11 AM2018-08-03T01:11:56+5:302018-08-03T01:15:36+5:30
सत्र न्यायालयाने दोन सख्ख्या बहिणींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला दुहेरी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने दोन सख्ख्या बहिणींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला दुहेरी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.
मोहम्मद कुतुबुद्दीन ऊर्फ सुभानी अंसारी वल्द कमरुद्दीन अंसारी (३०) असे आरोपीचे नाव असून तो सिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दुहेरी जन्मठेप व एकूण ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षे कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास तर, कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीने दोन जन्मठेपेची शिक्षा लागोपाठ भोगावी असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीची एक जन्मठेप संपल्यानंतर दुसरी जन्मठेप सुरू होईल.
ही घटना २७ नोव्हेंबर २०१५ रोजी घडली होती. आरोपी हा मयत मुलींच्या काकाचा साळा होय. मयत मुलींचे वडील कामावर असताना आरोपीने त्यांना फोन करून मोटरसायकल मागितली. त्यानंतर आरोपी ती मोटरसायकल घेऊन मयत मुलींच्या घरी गेला. तेथून त्याने मुलींना सोबत नेऊन त्यांचा खून केला. जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे व अॅड. ज्योती वजानी यांनी कामकाज पाहिले.