७० हजारात विकले दोन रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:59+5:302021-04-22T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी एका वाॅर्ड बॉयसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी एका वाॅर्ड बॉयसह तीन युवकांना अटक करून त्यांच्याजवळून दोन इंजेक्शन जप्त केले आहेत. प्राप्त माहितीनुसार हे दोन इंजेक्शन तब्बल ७० हजार रुपयांना विकण्यात आले होते.
शुभम संजय पानतावणे (२४), रा. सेवाग्राम वर्धा, प्रणय दिनकरराव येरपुडे (२१) आणि मनमोहन नरेश मदन (२१), रा. संघ बिल्डिंग महाल, अशी आरोपींची नावे आहेत. शुभम हा धंतोली येथील न्यूरॉन हाॅस्पिटलमध्ये वाॅर्ड बॉय आहे. तो गेल्या चार-पाच वर्षांपासून येथे काम करीत आहे. रामदासपेठमध्येच तो राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या साथीदारांच्या मदतीने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत होता. प्रणयची एका तरुणीसोबत ओळख आहे. या तरुणीकडून पोलिसांच्या पंटरने रेमडेसिविरसाठी संपर्क केला होता. तरुणीने प्रणयला रेमडेसिविर उपलब्ध करून द्यायला सांगितले. प्रणयने शुभमसोबत बोलणी केली. तो प्रणयला ३० हजार रुपयांत एक रेमडेसेविर इंजेक्शन द्यायला तयार झाला. तरुणीने पंटरला ३५ हजार रुपये किंमत सांगितली. मुळात इंजेक्शनची मूळ किंमत ३५०० रुपये आहे. पंटरने हो म्हणताच शुभमने प्रणयला रेमेडेसिविर घेण्यासाठी लोकमत चौकाजवळ बोलावले.
मंगळवारी रात्री ११ वाजता प्रणय मनमोहनसोबत लोकमत चौकाजवळ पोहोचला. त्याच्याजवळ दोन रेमडेसिविर होते. डीसीपी झोन चारचे रीडर पीएसआय महेश कुरेवाड यांच्या सूचनेवर सीताबर्डी पोलिसांनी लोकमत चौकाजवळ आपले जाळे पसरविले होते. त्यांनी तिघांनाही रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून दोन रेमडेसिविर, मोबाइलसह ८८ हजार रुपयाचा माल जप्त केला. शुभमने एका मित्राद्वारे रेमडेसिविर उपलब्ध केल्याचे सांगितले आहे. यात रुग्णालयाची कुठलीही भूमिका नाही, असे त्याचे म्हणणे आहे. पोलीस शुभमचा मित्र आणि संबंधित तरुणीच्या भूमिकेचा तपास करीत आहेत. आरोपींना एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पीआय अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनात एपीआय शेरकी करीत आहेत.
बॉक्स
पाच दिवसांत २० आरोपींना अटक
पाच दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराचे हे पाचवे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेवर १५ एप्रिल रोजी एका डॉक्टरसह तीन वॉर्ड बॉयला पकडून १५ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. यानंतर जरिपटका, वाठोडा आणि सक्करदरा पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांना पकडले. या कारवाईत आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहुतांश वाॅर्ड बॉय आणि मेडिकल स्टोअर्स कर्मचारी आहेत.