प्रवेशासाठी दोन नियम क से?
By admin | Published: March 26, 2016 02:57 AM2016-03-26T02:57:12+5:302016-03-26T02:57:12+5:30
आरटीई अंतर्गत नर्सरीमध्ये प्रवेशासाठी ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे.
आरटीई नियमात : इतर प्रवेशात मनमानी
नागपूर : आरटीई अंतर्गत नर्सरीमध्ये प्रवेशासाठी ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे ३१ जुलैपर्यंत आरटीईने निर्धारित केलेले वर्ष पूर्ण होण्यास एक दिवससुद्धा बाकी असेल, तर विद्यार्थ्याला प्रवेशासाठी एका वर्षाची वाट बघावी लागणार आहे. परंतु तोच विद्यार्थी प्रवेशासाठी इतर कुठल्याही शाळेत गेल्यास त्याला वयाची अडचण नाही. प्रवेशासाठी दोन नियम का? असा सवाल आरटीईच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी केला आहे. आरटीई अॅक्शन कमिटीकडे यासंदर्भातील पालकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
शासनाने बालकांच्या प्रवेशासंदर्भात किमान वय निर्धारित केले आहे. हा नियम आरटीईचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच इतरही विद्यार्थ्यांसाठी आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र सर्व विभागीय उपसंचालकांना पाठविण्यात आले आहे. नियमानुसार नर्सरीसाठी विद्यार्थ्यांचे ३१ जुलै २०१६ रोजी तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या या नियमाचे तंतोतंत पालन आरटीईमध्ये होते. कारण आरटीई प्रक्रिया आॅनलाईन असल्याने, निर्धारित केलेल्या तारखेला विद्यार्थ्याचे वय पूर्ण होत नसले तर, अर्जच स्वीकारला जात नाही. आरईटी अॅक्शन कमिटीकडे आकाश वसू व ज्ञानेंद्र तिवारी या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. आकाशला नर्सरीत प्रवेश हवा आहे. त्याला ३१ जुलै २०१६ ला तीन वर्ष पूर्ण होण्यासाठी आठ दिवस शिल्लक आहे. तर ज्ञानेंद्र तिवारी या विद्यार्थ्याला पहिल्या वर्गात प्रवेश घ्यायाचा आहे. त्याला पाच वर्ष पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. परंतु हे विद्यार्थी इतर शाळेत प्रवेशासाठी गेले असता, त्यांना वयाचे बंधन आड आले नाही. आरटीईच्या प्रक्रियेत येण्यासाठी त्यांना आणखी एक वर्ष वाट बघावी लागणार आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी पुढे येत असल्याचे आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहिद शरीफ यांनी सांगितले. मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण विभागाने किमान दोन महिन्यांची सूट द्यावी, अशी मागणी कमिटीतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)