मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात दोन बडे अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:31 PM2021-12-23T13:31:39+5:302021-12-23T13:34:37+5:30
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी व प्रिंटर पुरवठा घोटाळा प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत गेल्या आठवड्यापासून गाजत असलेल्या स्टेशनरी व प्रिंटर पुरवठा घोटाळा प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले.
मनपातील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात प्रथमदर्शनी प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा दोषी आढळले आहेत. त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७१ अन्वये विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी मनपा प्रशासनाला दिले.
चौकशीसाठी पुन्हा तीन सदस्यीय समिती
मनपा आयुक्तांनी स्टेशनरी घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती चौकशीसाठी गठित केली. मात्र या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. याचा विचार करता स्थायी समितीचे सदस्य ॲड. संजय बालपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली. आहे. यात समिती सदस्य प्रगती पाटील व आयशा उईके यांचा समावेश आहे.
पाच वर्षातील व्यवहारांची चौकशी
महापालिकेच्या कार्यालयांना स्टेशनरी व प्रिंटर साहित्याचा पुरवठा मनोहर साकोरे ॲण्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरुकृपा स्टेशनरी, एस. के. एंटरप्रायजेस, सुदर्शन आदी कंपन्यांकडून केला जात आहे. मागील काही वर्षांपासून या कंपन्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याने मागील पाच वर्षातील व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे.
अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने घोटाळा
मनपातील स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. कंत्राटदार व मनपातील अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
५४ लाखांचे धनादेश वटलेच नाही
स्टेशनरी घोटाळा उघडकीस आल्यानंतर ६७ लाख व ५४ लाख अशी एक कोटी २१ लाखांची रक्कम परत करण्यासाठी कंत्राटदारांनी मनपाला धनादेश दिले होते. यात ५४ लाखांचे चार धनादेश बँकेत वटलेले नाही. याप्रकरणात प्रशासन कारवाई करणार आहे.
अधिकारी आपसात भिडले
स्थायी समितीच्या बैठकीत खोट्या बिलावरील सह्यांवरून आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांच्यात खडाजंगी उडाली. बिलावरील सह्या तुमच्याच असल्याचे कोल्हे म्हणाले, तर या सह्या माझ्या नाहीत. बँक खात्यातील सह्या पडताळता येतील असे चिलकर यांनी म्हटले. यावरून दोघात चांगलाच वाद रंगला होता.
प्रशासकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई
मनपा आयुक्तांनी स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीच्या अहवालानंतर या प्रकरणात जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.