खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:14 PM2021-10-04T17:14:16+5:302021-10-04T17:15:00+5:30
Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली.
नागपूर: झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी मोठी बहीण तिच्या मागे गेली. त्यातच लहान बहिणीचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. त्या दोघींनाही वाचविण्यासाठी परिसरात कुणीही नसल्याने त्या दोघींचाही बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारपूर येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी घडली असून, सोमवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.
आराध्या विचारकर मांढरे (२) व आकांक्षा विचारकर मांढरे (५) रा. शिकारपूर, ता. कुही अशी बहिणींची नावे आहेत. विचारकर मांढरे यांच्याकडे शेती अथवा उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. विचारकर व त्यांची पत्नी रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. आराध्या व आकांक्षा त्यांच्या आजोबासोबत घरी होत्या. सायंकाळच्या सुमारास आजोबा काही कामानिमित्त गावात गेल्याने दोघीही घरासमोर खेळत होत्या.
दरम्यान, खेळता-खेळता आराध्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी आकांक्षा तिच्या मागे गेली. तलावाच्या काठावर ओली माती असल्याने आराध्याचा पाय घसरला व ती तलावातील पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी आकांक्षा पुढे सरसावली व पाय घसरल्याने तीही पाण्यात पडली. घटनेच्यावेळी तलावाजवळ कुणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघी पाण्यात पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.
काही वेळाने आजोबा घरी आल्यावर त्यांना दोघीही झोपडीत अथवा अंगणात दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दोघीही तलावात बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांना बोलावले. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व यादवराव कुंभरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर दोघींच्याही पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तलावाच्या काठी झोपडी
शिकारपूर गावापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठी त्यांनी झोपडी बांधली असून, त्यात त्यांचे म्हातारे वडील, पत्नी व दोन मुलींसोबत वास्तव्य आहे. त्यांच्या झोपडीच्या परिसरात दुसरी झोपडी अथवा घर नाही. त्यांना आराध्या व आकांक्षा या दोनच मुली होत्या. घटनेची माहिती मिळताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. एकाचवेळी दोघींचाही मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती.