नागपुरात स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:22 PM2020-04-18T21:22:17+5:302020-04-18T21:23:30+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मनाईआदेशाचे उल्लंघन करून शुक्रवारी पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी दोन तरुणींनी गिट्टीखदान परिसरात चांगलीच स्टंटबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मनाईआदेशाचे उल्लंघन करून शुक्रवारी पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी दोन तरुणींनी गिट्टीखदान परिसरात चांगलीच स्टंटबाजी केली. मात्र सर्वत्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी या दोघींना अडवून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र संचारबंदी लावली आहे. नागरिकांनी आपल्या घरातच राहावे, विनाकारण इकडेतिकडे फिरू नये, अशा सूचना आणि आवाहन पोलीस करीत आहेत. मात्र त्याला न जुमानता काही उपद्रवी मंडळी इकडून तिकडे फिरतात. त्यात तरुणींचाही समावेश आहे. अशाच पैकी एका मोपेडवर स्वार असलेल्या दोन तरुणी शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास भरधाव वेगात गिट्टीखदान चौक परिसरातून जात होत्या. एका ठिकाणी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी तेथे पोलिसांना कट मारून दुसरीकडे दुचाकी वळवली. मात्र दुसऱ्या भागातही पोलीस होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तिथे अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तेथून पुन्हा पोलिसांना चुकवून दुसऱ्या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहत असलेल्या तिसऱ्या ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस वाहनात बसून ठाण्यात नेले. तेथे त्यांना उठाबशा करावयास लावण्यात आले. त्यानंतर त्यांची दुचाकी जप्त करून पोलिसांनी त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली.