‘जेल ब्रेक’मध्ये दोघे अडकले

By admin | Published: April 7, 2015 02:03 AM2015-04-07T02:03:23+5:302015-04-07T02:03:23+5:30

सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक

Two stuck in a jail break | ‘जेल ब्रेक’मध्ये दोघे अडकले

‘जेल ब्रेक’मध्ये दोघे अडकले

Next

पाचही कैदी पळाले छिंदवाड्याकडे / पळून जाण्यास मदत; पैसेही मागून दिले
नागपूर :
सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. नवाब तोहिद खान (वय २२, रा. मानकापूर) आणि गणेश कमलकिशोर शर्मा (वय ३०, रा. ताजनगर) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी बिशनसिंग रामूलाल उईके, शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर या पाच खतरनाक कैद्यांना कारागृहातून पळून जाण्यात सक्रिय मदत केली.

राज्यातील सर्वात सुरक्षित समजला जाणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून उपरोक्त पाच खतरनाक कैदी मंगळवारी पहाटे पळून गेले. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पळून जाण्याचा कट रचला होता. तो अमलात आणण्यासाठी त्यांनी खान आणि शर्मा या गुन्हेगारांची मदत घेतली. हे दोघे जबरीचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. मोबाईलच्या माध्यमातून शोएब आणि गुप्ताच्या ते दोन आठवड्यांपासून सतत संपर्कात होते. कसे पळायचे, कुठून पळायचे यासाठी पळालेले कैदी आणि खान तसेच शर्मा एकमेकांच्या सतत संपर्कात होते. सोमवारी मध्यरात्री पलायनाचा कट अमलात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. ठरल्याप्रमाणे मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास नवाब खान आणि गणेश शर्मा चुनाभट्टीच्या दिशेला उभे राहिले. फोनवरून मिळणाऱ्या सूचनांनुसार त्यांनी बाहेरून दोर फेकला. त्याआधारे आरोपी बिशन उईके, शिबू खान, सत्येंद्र गुप्ता, प्रेम नेपाली आणि गोलू ठाकूर बाहेर आले. (प्रतिनिधी)

१ नातेवाईकांकडून घेतले पैसे नवाब खान आणि गणेश शर्माच्या मोटरसायकल तसेच अन्य एका वाहनावर बसून कैदी मोमीनपुऱ्यातील बकरामंडीत पोहचले. तेथून ते गुप्ताच्या पिवळी नदी येथील नातेवाईकांकडे आले. नातेवाईकांकडून पैसे घेतल्यानंतर आरोपी कोराडी मार्गावर आले. तेथून छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून पाचही खतरनाक कैदी महाराष्ट्राबाहेर पळाले.

पुन्हा दोन
तुरुंगाधिकारी निलंबित
दरम्यान, या प्रकरणात सोमवारी आणखी दोन वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वैभव आत्राम आणि अशोक मलवाड अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे आता निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या १० झाली आहे. यापूर्वी अधीक्षक कांबळे तसेच तुरुंगाधिकारी पारेकर आणि महाशिखरेला निलंबित करण्यात आले. त्यानंतर शनिवारी राजू पाटील, मंगेश प्रजापती, रमेश ढेकळे, अशोक भांडारकर आणि संजय ठोकळ या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

३ अब तक ४७ सोमवारी पुन्हा कारागृहात १२ मोबाईल, ४ सीमकार्ड, ७ बॅटरी आणि चार्जरसह ब्ल्यूटूथही सापडले. मंगळवारपासून कारागृहात सुरू असलेल्या झाडाझडतीत सोमवारपर्यंत एकूण ४७ मोबाईल सापडले. या कारागृहात किमान ५०० मोबाईल असल्याचे वृत्त लोकमतने यापूर्वी वेळोवेळी प्रकाशित केले, हे येथे उल्लेखनीय.

४ लोकमतचे वृत्त तंतोतंत दरम्यान खतरनाक कैद्याच्या पलायनाने राज्यभर खळबळ उडाली. कैद्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह शहर पोलिसांची वेगवेगळी पथके कामी लागली. मोबाईल टॉवरवरून सीडीआर काढण्यात आला. त्यात घटनेच्या वेळेदरम्यान तोहिद खान आणि गणेश शर्मांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स अधोरेखित झाले. हे दोघे यापूर्वी कारागृहात उपरोक्त कैद्यांच्या भेटीलाही गेले होते, त्याचीही पुष्टी झाली. त्यामुळे या दोघांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. ‘ठोकपीट’ झाल्यानंतर या दोघांनी कैदी पलायन प्रकरणाच्या कटाचा उलगडा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर केला. त्यांनी या कटात सहभागी असल्याची कबुली देतानाच पळून गेलेल्या कैद्यांबाबतही महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री या दोघांना परिमंडळ ४ चे उपायुक्त यिशू सिंधू यांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे, लोकमतने या प्रकरणात प्रकाशित केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरल्याचे अटकेतील आरोपीच्या जबानीवरून आणि एकूणच घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे.

दीक्षितांचे नो कॉमेंट
गेल्या तीन दिवसांपासून नागपूरच्या कारागृहात चौकशी करणारे पोलीस महासंचालक (एसीबी) प्रवीण दीक्षित सोमवारी पुन्हा ४ ते ५ तास कारागृहात होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. एल. बिष्णोई हे सुद्धा होते. त्यांनी सोमवारी बॉम्ब शोधक-नाशक पथकासह श्वान पथकालाही कारागृहात तपासणीसाठी बोलवून घेतले. मात्र, सोमवारीदेखील त्यांनी पत्रकारांसमोर चुप्पीच साधली. गेल्या तीन दिवसांपासून ते पत्रकारांपुढे येतात, मात्र कसल्याही प्रकारची माहिती उघड होणार नाही, याची ते कटाक्षाने काळजी घेत आहेत.

Web Title: Two stuck in a jail break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.